अनुराधा डोणगावकर यांचे प्रतिपादन

‘‘महाराष्ट्राची क्रीडासंस्कृती सक्षम आहे. फक्त ती कशा पद्धतीने आपण विकसित करतो, हे महत्त्वाचे आहे. क्रीडासंस्कृतीत झालेले सकारात्मक बदल स्वीकारल्यास महाराष्ट्रातील देशी खेळांचा विकास शक्य आहे,’’ असे मत माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्रातील देशी खेळ’ या विषयावर डोणगावकर यांच्यासह खो-खो संघटक व प्रशिक्षक अरुण देशमुख आणि मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी परिसंवादात सहभाग घेतला होता.

प्रो-कबड्डी लीगच्या यशाचे कौतुक करताना डोणगावकर यांनी राज्यातील संघटनांच्या संकुचित विचारांवर टिप्पणी केली. ‘‘राज्याबाहेरील संघ बक्षीस पटकावतात म्हणून शिवशाही चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय करण्यात आली आहे. संघटकांचा हा संकुचित विचार खेळाडूंसाठी घातक आहे. ते आज हरतील, उद्याही हरतील; पण त्यातूनही काहीतरी शिकतील. हा विचार संघटक करत नाही. इतर राज्यांची वाटचाल यशाकडे का व कशी होत आहे. त्याचा विचार करून राज्यातील देशी खेळाडूंनी वाटचाल करायला हवी, तरच महाराष्ट्रात बदल घडेल.’’

इतर राज्यांच्या तुलनेत देशी खेळांच्या विकासासाठी महाराष्ट्रात प्रयत्न होताना दिसत नसल्याची खंत अरुण देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील होते. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात किती ऑलिम्पिक कुस्तीपटू घडले. कुस्तीचा फड रंगला जातो, त्याच्या स्पर्धा होत नाहीत. संघटनांकडूनही प्रयत्न होताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे.’’

मोकळ्या जागेवर रुजत असलेल्या क्लबसंस्कृतीवर टीका करताना भास्कर सावंत म्हणाले की, ‘‘खेडय़ापाडय़ातील खेळांना वाव मिळायला हवा. आमच्याकडे स्पर्धाना उत्सवाचे स्वरूप असते, परंतु मुंबई-पुण्यात किती आत्मीयतेने संघटक येतात, हा प्रश्न सतावतो. येथे खेळापेक्षा पुढाऱ्यांसाठीच खेळाचे आयोजन होते. आता तर मोकळ्या जागांवर क्लबसंस्कृती रुजत आहे आणि ती देशी खेळांसाठी मारक आहे.’’

कोणत्याही चर्चासत्रात नकारात्मक गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करायला हवे. महाराष्ट्रातले देशी खेळ हे व्यावसायिकतेकडे झुकत आहेत. कबड्डीने उत्तम उंची गाठली आहे.क्रिकेटपेक्षा अधिक कबड्डीच्या स्पर्धा होतात, परंतु क्रिकेटमधील व्यावसायिकता त्यात नसते, हे तथ्य आहे. क्रिकेटकडून ती शिकता येईल. देशी खेळांना व्यासपीठ उपलब्ध नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. कबड्डीने ही व्यावसायिकतेची गणिते अचूकपणे जमवली आहेत.

-अनुराधा डोणगावकर,  माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू

नोकरी मिळवण्यापुरताच खेळाचा विचार होतो. एकदा नोकरी मिळाल्यानंतर खेळाडूचा खेळ थांबतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. प्रो-कबड्डीने इतर देशी खेळांना दिशा दाखवली आहे. खेळाची परिभाषा बदलत चालली आहे. त्यानुसार तो बदल स्वीकारायला हवा. जपानने ज्युदो, तर तैवानने तायक्वांदोसारखा खेळ ऑलिम्पिकपर्यंत नेला. त्यांच्या एकजुटीचे व चिकाटीचे हे श्रेय आहे.

– अरुण देशमुख, खो-खो प्रशिक्षक व संघटक

देशी खेळाचा विकास केला नाही, तर त्याची दखल कुणी घेणार नाही. विविध संघटनांनी एकत्र येऊन आपल्या अडचणी सोडवायला हव्यात. क्रीडा संघटक खुर्चीसाठी राबतो, तेव्हा खेळ मरतो. खेळाडू पुरस्काराचे ध्येय बाळगून मैदानात उतरतो आणि त्यापुढे तो विचार करत नाही. ही मानसिकता बदलायला हवी.

– भास्कर सावंत, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष