उपकर्णधार रोहित शर्माला बाद केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन आता ऋषभ पंतला गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. ऋषभ पंतने तिसऱ्या कसोटी सामन्यात लायनच्या गोलंदाजीची पीस काढली होती. त्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत धावा वसूल केल्या होत्या. आता ब्रिस्बेनच्या कसोटीत पुन्हा नॅथन लायन ऋषभला गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे.

उद्या ऋषभ पंत आणि नॅथन लायनचा सामना होऊ शकतो. नॅथन लायन आपला १०० वा कसोटी सामना खेळत असून आज दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याने रोहित शर्माचा (४४) धावांवर महत्त्वपूर्ण विकेट मिळवला. रोहितला त्याने मोठा फटका खेळायला भाग पाडून आपल्या फिरकीच्या जाळयात अलगद अडकवलं.

“आज प्रेक्षकांचा प्रतिसाद खूपच चांगला होता. रोहित जागतिक किर्तीचा खेळाडू आहे. त्याला मी माझ्यापरीने सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. काल पहिल्याच दिवशी तिसऱ्या दिवसासारखी खेळपट्टी झाली होती. खेळपट्टीवर काही तडे गेले होते. मी त्या ठिकाणी टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला. मी पेनच्या उजव्या ग्लोव्हजच्या लाइनवर गोलंदाजी करतो. त्या ठिकाणी काही तडे गेले आहेत. त्यामुळे उद्या खेळपट्टीकडून काही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.” असे नॅथन लायनने सांगितले.

“ऋषभ माझ्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यासाठी मी उत्सुक आहे. त्याच्यासोबतचा सामना नेहमीच शानदार असतो” असे नॅथन लायन म्हणाला.