बलाढय़ दिल्लीविरुद्ध निर्णायक विजयाची संधी गमावलेला महाराष्ट्र संघ गुजरातविरुद्ध ही संधी साधण्यासाठी उत्सुक झाला आहे. या दोन संघांमधील चार दिवसांच्या रणजी क्रिकेट सामन्याला गुरुवारी येथे प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्राने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली होती. या सामन्यातील कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. हर्षद खडीवाले व स्वप्निल गुगळे यांचा अपवाद वगळता पहिल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हीच महाराष्ट्रापुढील मोठी समस्या आहे. शेवटच्या फळीतील राहुल त्रिपाठी, चिराग खुराणा, श्रीकांत मुंढे यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी करीत अनेक वेळा महाराष्ट्रास तारले आहे. गोलंदाजीत त्यांना समाद फल्लाह, अनुपम संकलेचा व डॉमनिक मुथ्थुस्वामी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
गुजरातला नुकत्याच झालेल्या साखळी सामन्यात विदर्भ संघाने पराभवाचा दणका दिला होता. कर्णधार पार्थिव पटेल याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी या मोसमात अपेक्षेइतकी चमक दाखविलेली नाही. त्यांच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने पार्थिव याच्याबरोबरच रुजुल भट, वेणुगोपाल राव, प्रियांक पांचाळ, भार्गव मेराई यांच्यावर आहे. गोलंदाजीत रमेश पोवार या अनुभवी गोलंदाजांबरोबरच रुजुल भट, ईश्वर चौधरी, नीलेशकुमार चौहान यांच्याकडून गुजरातला प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.