खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानंगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी पदकांची कमाई केली. जलतरणात ज्योती पाटील आणि करीना शांक्ता यांनी महाराष्ट्राला सोनेरी यश मिळवून दिले तर नेमबाजीत हर्षदा निठवे हिने सुवर्णवेध घेतला.

जलतरण : ज्योती पाटीलचे सोनेरी यश

महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिने जलतरणात २१ वर्षांखालील मुलींच्या गटात २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर २ मिनिटे ४३.५४ सेकंदात पार केले. ज्योतीने चुरशीच्या शर्यतीत कल्याणी सक्सेना (गुजरात) व हर्षिता जयराम (कर्नाटक) यांचे आव्हान परतवून लावले. मुंबईच्या ज्योतीने आतापर्यंत शालेय व कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धाप्रमाणेच खुल्या राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक पदकांची कमाई केली आहे. करीना शांक्ता हिने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यत २ मिनिटे ४७.५५ सेकंदात पूर्ण करत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. तिचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. आकांक्षा बुचडे हिने २१ वर्षांखालील मुलींमध्ये १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत १ मिनिट ०८.४५ सेकंदासह रौप्यपदक पटकावले.

बास्केटबॉल : महाराष्ट्राचा विजय

समीर कुरेशी याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघाने मुलांच्या २१ वर्षांखालील गटात उत्तर प्रदेशवर ७४-६७ अशी मात करत विजयी सलामी दिली. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राला पहिल्या लढतीत तामिळनाडूकडून ६३-७१ असा पराभव स्वीकारावा लागला. पूर्वार्धात महाराष्ट्राने ३९-२९ अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या डावाच्या अखेरीस उत्तर प्रदेशने ५७-५० अशी आघाडी मिळविली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाला अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. त्याचे श्रेय समीर कुरेशी (१४ गुण), अक्षय खरात (१५) व अर्जुन यादव (१७) यांच्या खेळाला द्यावे लागेल.

खो-खो : दोन्ही संघ विजयी

खो-खो या खेळात महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलांच्या संघाने केरळचा तर मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा पराभव केला. मुलींच्या संघाने १४-०२ असा एक डाव १२ गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपी हिने ४.१० मिनिटे संरक्षण करताना अपेक्षा सुतारने २.५० मिनिटे पळतीचा खेळ केला. निकिता पवारने १.५० मिनिटे संरक्षण तर ऋतुजा खरेने ३ बळी मिळवले. मुलांच्या संघाला केरळवर १७-१३ असा फक्त ४ गुणांनी निसटता विजय मिळवता आला. या सामन्यात महाराष्ट्राच्या अवधूत पाटीलने २:४०, १:३० मि. संरक्षण व १ बळी तर संकेत कदमने २:००, १:३० मि. संरक्षण करत ४ गडी बाद केले.

कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश

कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश मिळाले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर ३१-१९ अशी मात करत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जोरदार चढाया व अचूक पकडी करत सहज विजय मिळविला. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी हिने अष्टपैलू खेळ करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये सलग दुसऱ्या पराभवामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यात महाराष्ट्राला हरयाणाने १७-३७ असे पराभूत केले.

नेमबाजी : हर्षदा निठवेचा सुवर्णवेध

औरंगाबादची नेमबाज हर्षदा निठवे हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी वेध घेत कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वर्षांखालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची नोंद केली. युविका तोमर (उत्तर प्रदेश) व श्व्ोता देवी (पंजाब) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर हर्षदा म्हणाली, ‘‘खरे तर या पेक्षा जास्त गुणांनी मी सुवर्णपदकजिंकायला हवे होते. ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करायची माझी तयारी आहे.’’

टेनिस : आर्यन भाटिया उपांत्य फेरीत

आर्यन भाटियाने हरयाणाच्या अजय मलिकवर ६-४, ६-४ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात करत टेनिसमधील मुलांच्या १७ वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याच्यापुढे हरयाणाच्या सुशांत दबासचे आव्हान असेल. याच गटात महाराष्ट्राच्या सानीष ध्रुवने दुसऱ्या फेरीत पुडुचेरीच्या अभिषेक रुद्रेश्वर याला ६-१, ६-० असे निष्प्रभ केले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात मिहिका यादव हिने उपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या काव्या बालसुब्रमण्यम हिला ६-०, ६-२ असे पराभूत केले.

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या स्नेहल भोंगळे हिने ८७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६८ किलो तर क्लीन आणि जर्कमध्ये ९२ किलो वजन उचलताना स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.

उत्तर प्रदेशची शिवांगी सिंग (१५४ किलो) व केरळची अमृथा जयन (१३७ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. अश्विनी मळगे हिने १७ वर्षांखालील मुलींच्या ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ८० तसेच क्लीन आणि जर्कमध्ये १०४ किलो वजन उचलत एकूण १८४ किलो वजन उचलले.

बॉक्सिंग : देविका घोरपडेचे पदक निश्चित

महाराष्ट्राच्या देविका घोरपडे आणि लक्ष्मी पाटील यांनी बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत मजल मारत पदक निश्चित केले. देविकाने १७ वर्षांखालील मुलींच्या ४६ किलो वजनी गटात गोव्याच्या आरती चौहान हिला ५-० असे हरविले. याच गटात लक्ष्मी पाटीलने मध्य प्रदेशच्या आयुषी अवस्थी हिच्यावर ५-० असा विजय मिळविला.