वानखेडे स्टेडियमवर आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या बॅटमधून बऱ्याचदा चौकार, षटकारांचा पाऊस पाहिला आहे. सचिन आणि विराट ज्या बॅटने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना कुटून काढायचे, ती बॅट घडवणारे हात मात्र सध्या आजारपणाचा, आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आंतरराष्ट्रीय सामने किंवा आयपीएलच्यावेळी बऱ्याचदा अश्रफ चौधरी वानखेडे स्टेडियमवर दिसायचे. त्यांच्या खांद्याला एक मोठी किटबॅग लावलेली असायची. त्यामध्ये वेगवेगळया बॅट्स आणि बॅटला लागणाऱ्या ग्रिप्स असायच्या.

अश्रफ यांनी फक्त सचिन, विराटसाठीच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, पोलार्ड यांच्यासाठी सुद्धा बॅट्स बनवल्या आहेत. या फलंदाजांनी अश्रफ भाईंनी बनवून दिलेल्या बॅटमधूनच चौकार, षटकारांची बरसात केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

७० च्या घरात असलेले अश्रफ चौधरी फलंदाजाच्या गरजेनुसार त्याला बॅट बनवून द्यायचे. तुटलेली बॅट जोडून देणे, बॅटचे वजन कमी करुन देणे, हँडल ट्रीम करणे अशी कामे ते करायचे. बॅट हातात घेतल्यानंतर फलंदाजाला समाधान मिळाले पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा.

आजारपणामुळे मागच्या काही आठवडयापासून अश्रफ भाई उपनगरातील एका रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. करोनामुळे नाही तर किडनी स्टोन आणि तब्येतीच्या अन्य कारणांमुळे ते रुग्णालयात दाखल आहेत.

प्रशांत जेठमालानी हे मागच्या १५ वर्षापासून अश्रफ चौधरी यांना ओळखतात. अश्रफ यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने प्रशांत त्यांच्या उपचारासाठी निधी जमा करायला मदत करत आहेत.

“त्यांची स्थिती चांगली नाही. किडनी स्टोनचा पुन्हा त्रास होत आहे. त्याशिवाय प्रकृतीच्या अन्य तक्रारीही आहेत. लॉकडाउनचा त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे मुंबईतील क्रिकेट पूर्णपणे बंद आहे. त्यांच्याकडे पैसा नाहीय, जो काही पैसा होता तो संपलाय” असे जेठमालानी म्हणाले.

“आम्ही आतापर्यंत दोन लाख रुपये जमा केले आहेत. पण आणखी पैशाची आवश्यकता आहे. भविष्याच त्यांना अडचणी येऊ नयेत, त्यासाठी आणखी निधी उभा करण्याची गरज आहे” असे प्रशांत जेठमालानी म्हणाले. १९२० पासून एम. अश्रफ ब्रोस असे त्यांचे छोटेस दुकान आहे. लॉकडाउनमध्ये दुकान बंद असल्याने त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी गावी निघून गेले. अश्रफ यांनी एक पैसाही न घेता काही क्रिकेटपटूंना मोफत बॅट देऊन मदतही केली आहे.