ऑस्ट्रेलियावर ५७ धावांनी विजय; मनदीप सिंग सामनावीर

भारतीय ‘अ’ संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा ५७ धावांनी पराभव केला आणि चौरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकली.

नाणेफेक जिंकल्यावर भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद २६६ धावा केल्या आणि मग यजमान संघाचा डाव ४४.५ षटकांत २०९ धावांत गुंडाळला.

मनदीप सिंगने ११ चौकारांच्या साह्याने १०८ चेंडूंत ९५ धावांची दमदार खेळी साकारली आणि सामनावीर पुरस्काराला गवसणी घातली. त्याला कर्णधार मनीष पांडेने (६१) सुरेख साथ दिली. याचप्रमाणे श्रेयस अय्यरने ४१ धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (३४) आणि निक मॅडिन्सन यांनी चांगली सुरुवात केली. परंतु यझुवेंद्र चहलने ३४ धावांत ४ बळी घेताना कांगारूंच्या डावाची दाणादाण उडवली.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा कर्णधार पीटर हँडस्कोंब (४३) आणि अ‍ॅलेक्स रोझ (३४) यांनी पराभव टाळण्याचा शर्थीने प्रयत्न केला. परंतु त्यांचा उर्वरित निम्मा संघ २६ धावांत गारद झाला.

भारत ‘अ’ संघाने ‘अ’ श्रेणीचा सलग तीन स्पर्धा जिंकताना प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला नमवण्याची किमया साधली आहे.