भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर क्रोएशिया येथे होणाऱ्या युरोपियन अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेदरम्यानच कलाशाखेच्या चौथ्या सत्राची पदवीची परीक्षा देणार आहे.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेला भारताच्या १५ नेमबाजांचा चमू सध्या क्रोएशिया येथे वास्तव्यास आहे. २० मेपासून युरोपियन नेमबाजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून त्यापूर्वी १८ मे रोजी मनूच्या परीक्षेला सुरुवात होईल. दिल्ली विद्यापीठाच्या महिलांच्या श्री राम महाविद्यालयाची शिष्य असलेल्या मनूला दौऱ्यावर परीक्षा देण्याची परवानगी असल्याने तिला स्पर्धेदरम्यानच अभ्यासाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. परंतु प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी पेपर नसल्यामुळे मनूला दिलासा मिळाला आहे.

‘‘यापूर्वीही मी अशाप्रकारच्या आव्हानाला सामोरी गेली आहे. त्यामुळे आताही परीक्षा आणि स्पर्धा या दोघांचा योग्य ताळमेळ साधण्यात मी यशस्वी होईन, याची खात्री आहे,’’ असे मनू म्हणाली. १९ वर्षीय मनू ऑलिम्पिकमध्ये तीन नेमबाजी प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून तिच्याकडून यंदा पदकाची सर्वाधिक आशा बाळगली जात आहे.