करोना साथीच्या कालखंडात समाजमाध्यमाद्वारे विपणनाचे सामर्थ्य कमालीचे वाढले आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटला चाहत्यांकडे पोहोचण्यासाठी याच माध्यमाकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, अशा शब्दांत ‘स्टार आणि डिस्ने इंडिया’चे प्रमुख संजोग गुप्ता यांनी विश्लेषण केले.

समाजमाध्यमांमुळे खेळाडू आणि चाहते अधिक जवळ आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘झूम’द्वारे जगभरातील ५० मुलांशी विराट कोहली बोलू शकतो याचा आतापर्यंत आपण कधीच विचार केला नव्हता, असे गुप्ता यांनी सांगितले. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. हॉटस्टारवर मराठीतील समालोचनसुद्धा उपलब्ध असेल. यात संदीप पाटील, अमोल मुझुमदार या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. ‘आयपीएल’च्या देशभरातील चाहत्यांमधील २० टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे, असे गुप्ता यांनी आवर्जून सांगितले.

‘‘गतवर्षी ‘आयपीएल-२०२०’ होईपर्यंत करोनामुळे देशभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित होत्या. क्रिकेटनंतर इंडियन सुपर लीग फुटबॉलसुद्धा यशस्वी झाली. पण तळागाळातल्या वयोगटांच्या, क्लबस्तरीय आणि हौशी क्रीडा स्पर्धांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे या धक्क्यातून सावरायला आणि पूर्वपदावर यायला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागेल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

प्रक्षेपणकर्त्यांसाठी जैव-सुरक्षित वातावरण आव्हानात्मक!

खेळाडूंपेक्षाही प्रक्षेपणकर्त्यांसाठी जैव-सुरक्षित वातावरणात अधिक कठीण स्वरूपाचे असते.  प्रत्येक संघात खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक यांच्यासह कमाल ७० सदस्य असतात. परंतु ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामासाठी समालोचकांसह जवळपास ७५० प्रक्षेपण कर्मचारी विविध जैव-सुरक्षित केंद्रांत कार्यरत आहेत. याशिवाय हॉटेलचे कर्मचारी, स्वयंपाकी, चालक यांनाही या जैव-सुरक्षित वातावरणात गणले जाते, असे गुप्ता यांनी सांगितले. ‘‘कोणत्याही संघाचे खेळाडू ७ किंवा १० दिवस आधी संघात विलगीकरणासाठी दाखल होतात. परंतु प्रक्षेपण कार्यातील बरेसचे व्यक्ती किमान तीन आठवडे आधी जैव-सुरक्षित वातावरणात दाखल होतात. म्हणजेच त्यांना ‘आयपीएल’साठी तीन महिने जैव-सुरक्षित वातावरणात घालवावे लागणार आहेत. खेळाडूंना दीड महिन्यांत १४ ते १७ सामने खेळायचे आहेत. पण प्रक्षेपण कर्मचाऱ्याला प्रत्येक दिवसाआड कार्यरत राहावे लागते. याशिवाय त्यांचे मैदानावरील कार्य चार तास आधी सुरू होते आणि सामना संपल्यावर दोन तासांनी संपते,’’ अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची कमाल!

सामन्याचे थेट प्रक्षेपण झाल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीच्या साहाय्याने आम्ही चार मिनिटांत त्याची क्षणचित्रे तयार करू शकू, असे गुप्ता यांनी सांगितले. ‘‘येत्या ‘आयपीएल’मध्ये नवे काय, याची यादी बरीच मोठी आहे. परंतु थोडक्यात सांगायचे तर यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सुरुवातीचे सामने हे प्रेक्षकांविनाच होणार आहेत. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना घरी बसून सामन्याशी जोडणारी ‘फॅनवॉल’ प्रणाली आम्ही राबवणार आहोत. याशिवाय हॉटस्टारवर क्रिकेटचाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहितही करता येणार आहे,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.