ओडीशातील भुवनेश्वरमध्ये हॉकी विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सुरुवात केली. भारताच्या नवोदित संघाने आफ्रिकेवर ५-०अशी मात केली. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान या स्पर्धेत वेगळ्या गटात असून त्यांचा पहिला सामना १ डिसेंबर रोजी आहे. पण सामन्याआधीच पाकिस्तानचा संघ आणि स्पोर्ट स्टाफ अत्यंत खुश आहे. पाकिस्तानपेक्षा भारतात आम्हाला जास्त मान मिळतो, असे वक्तव्य पाकिस्तानच्या हॉकी संघाचे व्यवस्थापक हसन सरदार यांनी केले आहे.

यंदाचा हॉकी विश्वचषक भारतात होत आहे. भारतात हॉकी हा खेळ कसा असतो, हे लोकांना नीट माहिती आहे. पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा आम्हाला भारतात जास्त मान दिला जातो. भारतीय चाहत्यांना हॉकीबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे, त्यामुळे त्यांना हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंबाबत प्रेम आहे, असे ते म्हणाले.

संघाच्या रणनीतीबाबत बोलताना ते म्हणाले की आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत. आक्रमण फळी, मधली फळी आणि बचाव फळी अशा तीनही क्षेत्रात आमच्या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. आम्ही आमचा संघावर पूर्ण विश्वास ठेवला असून ‘एक तर चेंडू गोलपोस्टमध्ये घालवा किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूला हाणा’ अशी आमची रणनीती आहे.