ग्युएटमालाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात गोलांची हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीने सर्वाधिक गोल करणाऱ्या दिएगो मॅराडोना यांना मागे टाकले. अर्जेटिनाने हा सामना ४-० असा सहज जिंकला.
१४व्या, ४०व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल करणाऱ्या मेस्सीने अर्जेटिनासाठी ३५ गोल झळकावण्याची किमया केली. माजी कर्णधार आणि १९८६मध्ये अर्जेटिनाला विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू मॅराडोना (३४ गोल) यांना मेस्सीने एका गोलने मागे सारले. मेस्सीने हेर्नान क्रेस्पो याच्या ३५ गोलांशी बरोबरी साधली. आता गॅब्रिएल बॅसिस्टुटा यांच्या ५६ गोलांचा विक्रम मोडण्याचे मेस्सीचे ध्येय आहे.
मेस्सीने १४व्या मिनिटाला ग्युएटमालाची बचावफळी भेदून एका धीम्या गतीच्या फटक्याद्वारे अर्जेटिनाचे खाते खोलले. त्यानंतर पहिल्या सत्राच्या काही मिनिटे आधी त्याने पेनल्टीवर दुसरा गोल केला. इझेक्वाईल लावेझ्झीने उजव्या कॉर्नरवरून दिलेल्या क्रॉसवर मेस्सीने तिसरा गोल लगावून हॅट्ट्रिक साजरी केली.