सहा पराभवांनंतर पहिलावहिला विजय मिळवून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुणांचे खाते उघडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु विजयाचे सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर बेंगळूरुसमोर मुंबई इंडियन्सचे अवघड आव्हान असेल.

पराभवांची मालिका चालू असताना बेंगळूरुसाठी कोणतीच गोष्ट अनुकूल घडत नव्हती. शनिवारी बेंगळूरुने कर्णधार विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर हंगामातील पहिला विजय साजरा केला. परंतु पंजाबविरुद्धच्या विजयानंतरही बेंगळूरुचा संघ ‘आयपीएल’ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे बाद फेरीसाठी आव्हान टिकवायचे असेल, तर बेंगळूरुला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागतील.

बेंगळूरुचा संघ कोहली आणि डी’व्हिलियर्स यांच्यावर मोठय़ा प्रमाणात विसंबून असतो. त्यामुळे विश्वचषक संघनिवडीचे आव्हान पार पडल्यानंतर मुंबईकरांच्या साक्षीने फटकेबाजीचा आनंद कोहलीसह डी’व्हिलियर्सलाही लुटतो येईल. कोहलीने सात सामन्यांत २७० आणि डी’व्हिलियर्सने सात सामन्यांत २३२ धावा केल्या आहेत. पार्थिव पटेलसुद्धा (सात सामन्यांत १९१ धावा) सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. गोलंदाजीत बेंगळूरुची मदार यजुर्वेद्र चहलवर (एकूण ११ बळी) आहे.

दुसरीकडे, मुंबईने शनिवारी राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करला. परंतु दुखापतीमुळे एक सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माची (एकूण १६५ धावा) खेळी मुंबईसाठी सकारात्मक म्हणावी लागेल. क्विंटन डी कॉक (एकूण २३८ धावा) आणि हार्दिक पंडय़ा जबाबदारीने फलंदाजी करीत आहेत. परंतु इशन किशन, सूर्यकुमार यादव (एकूण १५४ धावा), किरॉन पोलार्ड (एकूण १८५ धावा) आणि कृणाल पंडय़ा (एकूण ९२) यांच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. याचप्रमाणे गोलंदाजांनी जोस बटलरच्या आतषबाजीतून सावरण्याची आवश्यकता आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. संघव्यवस्थापनाने त्याच्या उपलब्धतेबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १