सोमवारी आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात धोनीचे नेतृत्व आणि रवींद्र जडेजाचे उत्तम क्षेत्ररक्षण सर्वांना पाहायला मिळाले. इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉनने जडेजासंबंधी एक प्रतिक्रिया दिली आहे. धोनीनंतर जडेजाकडे चेन्नईचे नेतृत्व सोपवावे, असे वॉनला वाटते.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि चार झेलही पकडले. चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 45 धावांनी सहज पराभव केला. क्रिकबझवर झालेल्या संभाषणादरम्यान मायकेल वॉन म्हणाला, ”तुम्ही म्हणाल, की एमएस धोनी आणखी 2-3 सामने खेळणार आहे, पण खरे सांगायचे, तर तो यापुढे खेळणार नाही. माझ्या मते, रवींद्र जडेजा असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या भोवती एक टीम तयार केली पाहिजे. माझ्या मते तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये जबरदस्त आहे. त्याची मानसिकताही चांगली आहे.”

मायकेल वॉनच्या म्हणण्यानुसार रवींद्र जडेजा आघाडीच्या 4 फलंदाजांमध्येही फलंदाजी करू शकतो. प्रतिस्पर्ध्याला समोर ठेऊन तो गोलंदाजीचीही सुरुवात करू शकतो. वॉन म्हणाला, ”जडेजा हा एक खेळाडू आहे, ज्याला आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकतो. आपण त्याच्याकडून गोलंदाजीची सुरुवातही करू शकता. तो इतका महान क्रिकेटपटू आहे, की तो ही जबाबदारी स्वीकारू शकतो.”

चेन्नईचे दमदार पुनरागमन

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल हंगामात 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना गमावला. त्यानंतर चेन्नईने शानदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.