भारताच्या स्थानिक फुटबॉल मधील सर्वात जुना आणि प्रथितयश क्लब म्हणून ओळख असलेल्या मोहन बागान क्लबने, सध्याच्या काळात आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडलं आहे. संपूर्ण देश करोना विषाणूशी लढत असताना, मोहन बागान फुटबॉल क्लबने पश्चिम बंगाल सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपल्या फेसबूक पेजवरुन क्लबने या मदतीसंदर्भातली घोषणा केली आहे.

एकता आणि मानवता ही दोन मुल्य फुटबॉलसाठी महत्वाची आहेत. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं असून इतरांनीही या संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असं आवाहन मोहन बागान फुटबॉल क्लबने केलं आहे. “सध्याचा काळ खडतर आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही मागे राहता कमा नये. आम्ही केलेली मदत ही केवळ एक सुरुवात आहे. इतरांनीही आपली जबाबदारी ओळखत मदत केली तर गरजू व्यक्तींना आपण मदत करु शकतो. आपण सर्व मिळून या संकटाचा सामना करु शकतो.” मोहन बागान फुटबॉल क्लबचे सचिव स्रिंजय बोस यांनी आपलं मत मांडलं.

काही दिवसांपूर्वी मोहन बागानने I League स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. दरम्यान, अनेक भारतीय खेळाडू करोनाविरोधातील लढ्यात आपली भूमिका बजावत आहेत. आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, हिमा दास, सुरेश रैना या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपलं सामाजिक भान राखत मदत केली आहे. याव्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे.