महेंद्रसिंग धोनी हा ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या याच ‘कूल’ अंदाजामुळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच त्याचे चाहते होऊन जातात. वयाची पस्तिशी ओलांडूनसुद्धा संघात येणाऱ्या तरुण खेळाडूंशी धोनीचे ‘ट्युनिंग’ अगदी छान जुळतं. याच्या मागचं गुपित काय असेल असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. एका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने यामागचं गुपित उघड केलं आहे.

आशिया चषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने एका सामन्यासाठी विश्रांती घेतली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. कर्णधार म्हणून तो धोनीचा २०० वा सामना होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीला शुभेच्छा देण्यासाठी एक छानसा व्हिडीओ तयार करून संदेश दिला होता. या व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने IPLमधील काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यात त्याने धोनीचे ‘ते’ गुपित उघड केले आहे.

‘IPLचे सामने सुरु असताना धोनी आपल्या खोलीत शिशा किंवा हुक्का लावतो. त्यानंतर त्याची खोली ही सर्वांसाठी खुली असते. तरुण खेळाडू धोनीच्या या ‘कूल’ अंदाजाने त्याच्याशी स्वतःहून संवाद साधतात. त्यांनंतर त्या खोलीत क्रिकेट सामन्यातील गप्पांचे फड रंगतात. तरुण खेळाडूंशी मनमोकळेपणे संवाद साधण्यासाठी काय करावे, हे धोनीला नीट माहिती आहे, असे बेली म्हणाला.