महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली असतानाच संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘धोनीच्या निवृत्तीची चर्चा अर्थहिन आहे. गोलंदाजांचे प्रशिक्षक भारत अरुण यांना चेंडू दाखवण्यासाठी धोनीने पंचाकंडून चेंडू मागून घेतला, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

लागोपाठ दोन एकदिवसीय सामन्यांमधील संथ फलंदाजीमुळे महेंद्रसिंह धोनीवर टीका होत आहे. पराभवाचे खापरही त्याच्यावर फोडले जात आहे. तिसऱ्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्याने त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. धोनीने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेण्याआधी सामना संपल्यानंतर पंचांकडून यष्टी मागून घेतल्या होत्या. त्याचा संदर्भ तिसऱ्या एकदिवसीय सामन्याशी जोडण्यात आला. तिसऱ्या सामन्यानंतर धोनीने चेंडू मागून घेतला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला बहर आला होता.

प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अखेर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘धोनीच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक आहे. धोनीला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना चेंडू दाखवायचा होता. चेंडू बघून प्रशिक्षकांना इंग्लंडमधील खेळपट्टीचा अंदाज यावा म्हणून धोनीने चेंडू मागून घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. धोनी कुठेही जात नाहीये, असे सांगत त्यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.  धोनीवर टीका होत असेल तर तो ती सहन देखील करु शकतो. मात्र, टीकेमुळे त्याचे संघातील महत्त्व कमी होणार नाही, असे शास्त्रींनी म्हटले आहे.