भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबईचं वानखेडे मैदान आणि धोनी यांचं एक खास नातं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करुन २८ वर्षांनी विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं. धोनीचा अखेरचा षटकार आजही अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनावर कोरला गेलेला आहे. भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशन धोनीचा आगळा वेगळा सत्कार करण्याची शक्यता आहे. धोनीच्या नावाने वानखेडे मैदानावर एक जागा कायम राखीव ठेवण्यात यावी असा प्रस्ताव MCA च्या वरिष्ठ कार्यकारणीचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासदंर्भातलं वृत्त दिलं आहे.
२०११ साली भारताला विश्वचषक जिंकवून देताना धोनीने लगावलेला षटकार जिथे गेला त्या ठिकाणी एक जागा MCA धोनीसाठी कायमस्वरुपी राखीव ठेवू शकते. भारतीय क्रिकेटसाठी धोनीने दिलेल्या योगदानाचा आदर आणि सन्मान करण्यासाठी MCA ने याचा विचार करावा अशी मागणी अजिंक्य नाईक यांनी आपल्या पत्रात केली आहे. नुवान कुलशेखरच्या गोलंदाजीवर धोनीने ठोकलेला तो षटकार MCA पॅव्हेलियनच्या जागेवर पडला होता. ती जागा शोधून चेंडू जिथे पडला ती जागा धोनीसाठी राखीव करता येईल असं नाईक यांनी सुचवलं आहे.
आतापर्यंत भारतीय क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करताना MCA ने मैदानातील स्टँडला खेळाडूंची नावं दिली आहेत. वानखेडे मैदानात सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, विजय मर्चंट या खेळाडूंच्या नावे खास स्टँड आहेत. तसेच पॉली उम्रीगर आणि विनू मंकड या खेळाडूंची नावं वानखेडे मैदानाच्या गेटला दिली आहेत. पण स्टेडीयमवर एखादी सीट खेळाडूसाठी राखीव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. MCA च्या आगामी बैठकीत नाईक यांच्या मागणीवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.