इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या पर्वाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज हा सामना खेळत दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे आठ पर्वांमध्ये चेन्नईची कमान सांभाळणारा महेंद्रसिंग धोनीच यावेळीही संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. यावेळी आयपीएलची सुरुवात ६ एप्रिलला होणार होती, मात्र नंतर तारखा बदलण्यात आल्या. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमात सर्व संघांचे कर्णधार सामील होऊ शकणार नाहीयेत.

पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्जचा असल्या कारणाने महेंद्रसिंग धोनी सध्या कसून सराव करत आहेत. मैदानात नेट प्रॅक्टिसदरम्यान धोनी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. फक्त विकेटकिंपिंग नाही तर फलंदाजीतही आपलं सर्वोत्तम देण्याचा धोनीचा प्रयत्न असणार आहे. गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्जच्या कॅम्पनमध्ये धोनी सामील झाला आणि चेन्नईमधील एम ए चिदंबरम इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये आगामी सामन्यासाठी तयारी करताना दिसला. सीएसकेने धोनी सराव करतानाचे दोन व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.