दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आलेला धावांचा महापूर, उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सहाशे धावांचा डोंगर उभारूनही विजयाने दिलेली हुलकावणी, यानंतर वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी कुरण असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे रेल्वे आणि मुंबई यांच्यातील सामना दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, पण अखेर वानखेडेवर झालेल्या या सामन्यात पहिल्याच दिवशी तब्बल १२ फलंदाज बाद झाल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. वानखेडेच्या खेळपट्टीने टाकलेली कात, हाच सामन्याच्या पहिल्या दिवसाचा चर्चेचा विषय ठरला.
रेल्वेचे खेळाडू विकेट आंदण देत होते, पण स्वैर मारा करत मुंबईने रेल्वेच्या संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठू दिला. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने चांगली गोलंदाजी करत चार फलंदाजांना माघारी धाडले असले तरी त्याला अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, पण तरीही रेल्वेची धावगाडी मुंबईने २१७ धावांवर रोखली. सुदैवी अरिंदम घोषने रेल्वेकडून अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने पहिल्या दिवसअखेर अवघ्या चार धावांवर दोन फलंदाज गमावले आहे.
संक्षिप्त धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : ८४.५ षटकांत सर्व बाद २१७ (अरिंदम घोष ६७, सागर मिश्रा ४६; शार्दूल ठाकूर ४/ ३८) मुंबई (पहिला डाव) : ३.५ षटकांत २ बाद ४ (अखिल हेरवाडकर खेळत आहे २; कर्ण शर्मा १/१).