उद्घाटनीय लढतीत आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्ज समोरासमोर

दहा वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतरही या लीगच्या प्रेक्षकक्षमतेचा झरा आटलेला नाही. त्यामुळे चाहतेही आयपीएलचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या माजी विजेत्यांचे पुनरागमन होत असल्याने त्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार खेळाचा मनमुराद आस्वाद लुटला जाणार आहे.

यजमान मुंबईच्या कामगिरीपेक्षा दोन वर्षांनंतर लीगमध्ये खेळणाऱ्या चेन्नईकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या मिडास स्पर्शाने चेन्नईने दोन वेळा लीगचे जेतेपद पटकावले आहे आणि चार वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे झोकात पुनरागमन करण्याच्या निर्धाराने हा संघ मैदानात उतरणार आहे. पुनरागमन करताना धोनीने आपले जुनेच सहकारी संघात कायम राहतील याची काळजी घेतली आहे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो हे धोनीचे हुकमी एक्के आहेत. त्यात मुंबईचा हरभजन सिंग यंदा चेन्नईकडून खेळणार असल्याने धोनीची गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा फॅफ डय़ू प्लेसिस, सॅमी बिलिंग्स, शेन वॉटसन हेही चेन्नईचे हुकमी शिलेदार आहेत.

मुंबईची भिस्त कर्णधार रोहित शर्मावरच आहे. तो कोणत्या क्रमांकावर उद्या फलंदाजीला उतरेल याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी, त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रोहितची बॅट तळपल्यावर सर्वोत्तम गोलंदाजही त्याच्यासमोर निष्प्रभ होतात, याची अनुभूती अनेकदा आलेली आहे. त्यामुळे शनिवारच्या लढतीत त्याचे फॉर्मात येणे मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय वेस्ट इंडिजचे एलव्हीन लुईस व किरॉन पोलार्ड, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाड या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. हार्दिक आणि कृणाल या पंडय़ा बंधूचा अष्टपैलू खेळ मुंबईसाठी जमेची बाजू आहे. गोलंदाजीत जस्प्रीत बुमरा, पॅट कमिन्स, मुस्ताफिजूर रेहमान, मिचेल मॅक्लेघन हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहेत. हरभजनच्या अनुपस्थितीत मुंबईच्या फिरकीची जबाबदारी राहुल चहर, अनुकूल रॉय आणि श्रीलंकेचा अकिला धनंजया यांच्यावर आली आहे.

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामने नेहमी चुरशीचे झाले आहेत. त्यामुळे उद्याच्या लढतीतही तशाच संघर्षांची अपेक्षा आहे. सलामीच्या लढतीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ कंबर कसून मैदानात उतरतील, यात शंका नाही. त्यामुळे दोन्ही संघांवर प्रचंड दडपण असणार आहे आणि ते दडपण झुगारण्यात जो यशस्वी होईल, तो संघ जिंकेल.   – रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा कर्णधार

  • वेळ : सायंकाळी ६ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स