धवल कुलकर्णीची भेदक गोलंदाजी; जय बिस्ताचे सुरेख अर्धशतक

कर्णधार धवल कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत पंजाबवर ४३ धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांत (चार विजय, एक रद्द) १८ गुणांसह मुंबईचा संघ अ-गटात दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबईने दिलेल्या २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव अवघ्या ४४.३ षटकांत २०२ धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा सलामीवीर जय बिस्ताने सुरेख अर्धशतक झळकावले. त्याला सिद्धेश लाड (३५), सूर्यकुमार यादव (३१) यांनी चांगली साथ दिली. जयने पहिल्या विकेटसाठी अखिल हेरवाडकरसह ७५, तर दुसऱ्या विकेटसाठी सिद्धेशसह ५५ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यावर मुंबईचा डाव घसरला. त्यातच यष्टीरक्षक आदित्य तरे (१३) व शिवम दुबे (८) हे दोघेही धावबाद झाल्याने मुंबईचा डाव संपूर्ण षटके न खेळता ४९ षटकांतच २४५ धावांवर संपुष्टात आला.

प्रत्युत्तरात पंजाबने छान सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. शुभमन गिल (४०) आणि अनमोलप्रीत सिंग (३५) यांना अनुक्रमे दुबे व शार्दूलने बाद केले. कर्णधार मनप्रीत सिंग (३२) आणि अनुभवी युवराज सिंग (२६) यांनीसुद्धा बहुमूल्य धावांचे योगदान देत पंजाबला विजयाच्या दिशेने नेले. मात्र कुलकर्णीने या दोघांनाही दोन षटकांच्या अंतरात बाद केल्यामुळे मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. ५ बाद १७२ धावांवरून त्यांचा संघ ९ बाद २०२ धावांवर येऊन ठेपला.

यष्टीरक्षक अभिषेक गुप्ताने संघाच्या विजयासाठी नाबाद झुंजार ३३ धावांची खेळी साकारली. मात्र कुलकर्णीने शेवटचा बळी मिळवत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कुलकर्णी आणि शार्दूलने प्रत्येकी तीन, तर दुबेने दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई : ४९ षटकांत सर्व बाद २४५ (जस बिस्ता ६८, सिद्धेश लाड ३५; मनप्रीत गोनी २/२६) विजयी वि.
  • पंजाब : ४४.३ षटकांत सर्वबाद २०२ (शुभमन गिल ४०, अनमोलप्रीत सिंग ३५; धवल कुलकर्णी ३/१८, शार्दूल ठाकूर ३/५३).