उत्तराखंडचा १० गडी राखून धुव्वा, सत्यजीतचे चार बळी

डावखुरा फिरकीपटू सत्यजीत बच्छावने पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजराणा पेश करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने मिळवलेल्या चार बळींच्या जोरावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘इ’ गटातील सामन्यात उत्तराखंडला तब्बल १० गडी व ७० चेंडू राखून नामोहरम केले.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने उत्तराखंडचा डाव १८.१ षटकांत ८९ धावांत गुंडाळला. कर्णधार रजय भाटिया (२८) व वैभव पवार (२५) वगळता उत्तराखंडचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. सत्यजीतने चार आणि विशाल गीतेने दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात कर्णधार राहुल त्रिपाठी (नाबाद ५१) व ऋतुराज गायकवाड (नाबाद २८) यांनी सहज महाराष्ट्राचा विजय साकारला. दोघांनी पहिल्या गडय़ासाठी ९० धावांची अभेद्य भागीदारी रचत ८.२ षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने नऊ चौकार व एका षटकारासह २८ चेंडूंतच ५१ धावा काढल्या.

या विजयासह महाराष्ट्राने गुणतालिकेत तूर्तास दुसरे स्थान पटकावले असून त्यांचे पाच सामन्यांतून चार विजय व एका पराभवासह १६ गुण झाले आहेत. सरस धावगतीच्या आधारावर उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राचा पुढील सामना गुरुवारी बडोद्याविरुद्ध होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

  • उत्तराखंड : १८.१ षटकांत सर्वबाद ८९ (रजत भाटिया २८; सत्यजीत बच्छाव ४/१८, विशाल गीते २/११) पराभूत वि. महाराष्ट्र : ८.२ षटकांत बिनबाद ९० (राहुल त्रिपाठी नाबाद ५१, ऋतुराज गायकवाड नाबाद २८).