प्रणव चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने ब्राझील ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र प्रकारात जेतेपदाची कमाई केली. या जोडीचे ग्रां. प्रि. श्रेणीच्या स्पर्धेचे हे पहिलेच जेतेपद आहे. अंतिम लढतीत अव्वल मानांकित प्रणव आणि सिक्की जोडीने कॅनडाच्या टॉबी एनजी आणि राचेल होंडरिच जोडीवर २१-१५, २१-१६ असा विजय मिळवला.

‘प्रणवच्या साथीने मिळवलेल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाने प्रचंड आनंद झाला आहे. माझ्या कुटुंबीयांच्या आधारामुळे हे शक्य झाले. या स्पर्धेसाठी वैयक्तिक खर्च करत त्यांनी मला पाठवले. जेतेपदासह त्यांच्या विश्वासाला पात्र ठरले याचे समाधान आहे. तान किम हर, पुल्लेला गोपीचंद या प्रशिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. अरुण विष्णू, सुमीत रेड्डी या सहकारी मित्रांमुळे सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा मिळाली’, असे सिक्कीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटले आहे.

२०१४ आणि २०१६ मध्ये उबेर चषकात कांस्यपदक विजेत्या भारतीय महिला संघाचा सिक्की अविभाज्य भाग होती. कारकीर्दीत आतापर्यंत सिक्की मिश्र प्रकारात व्ही. दिजू, अल्विन फ्रान्सिस, तरुण कोना, मनू अत्री आणि के. नंदगोपाळ यांच्या बरोबरीने खेळली आहे.

२३ वर्षीय सिक्कीने गेल्या वर्षी चॅलेंजर श्रेणीच्या पाच स्पर्धाची जेतेपदे नावावर केली. यामध्ये दोन मिश्र तर तीन महिला दुहेरी प्रकारातील होती. युगांडा येथील स्पर्धेत सिक्कीने पूर्वीशा रामच्या साथीने खेळताना महिला दुहेरीत तर तरुण कोनाच्या साथीने मिश्र प्रकारात जेतेपदाला गवसणी घातली. प्रज्ञा गद्रेच्या साथीने खेळताना सिक्कीने पोलिश आणि लाओस स्पर्धेत जेतेपदावर कब्जा केला.

प्रणवने गेल्या वर्षी अक्षय देवलकरच्या साथीने खेळताना सय्यद मोदी ग्रां. प्रि. स्पर्धेत कोरियाच्या किम जी जुंग आणि किम सा रंग जोडीवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनला नमवण्याची किमया करणारा भारतीय संघाचा २३ वर्षीय प्रणव भाग होता.

२०१० मध्ये मिश्र प्रकारात राष्ट्रीय विजेता प्रणव दोन वर्ष मुंबईत उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळत होता. त्यानंतर तो हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीत सराव करतो.