आठ मार्चपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या सामन्यांना प्रारंभ झाला. यात काही ‘ब’ गटातील ‘बाद’ फेरीचे सामने, तर काही ‘सुपर टेन’मधील साखळी सामने खेळवले जात आहेत. खरे तर, विश्वचषकातील इतके सामने नागपूरच्या वाटेला येणे हे भाग्यच. कारण, आजवरचा इतिहास बघितला तर ट्वेन्टी २० विश्वचषकातील केवळ दोन किंवा चार सामने नागपूरच्या वाटेला आलेले आहेत. ही प्रथम वेळ आहे जेव्हा तब्बल ११ सामन्यांची मेजवानी नागपूरच्या पदरात पडली आहे, पण दुर्देव असे की, इतके सामने असूनही नागपूरकरांनी या विश्वचषकाला ठेंगा दाखविला आहे.

स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या तुरळक गर्दीत विश्वचषक पार पडत आहे. तब्बल ४६ हजार प्रेक्षकक्षमतेच्या ‘वर्ल्ड क्लास’ स्टेडियमवर अल्प प्रेक्षक दिसत आहेत. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत नागपूरला झालेल्या अफगाणिस्तान, स्कॉटलंड, झिम्बाब्वे व हाँगकाँगच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा अभाव स्पष्ट दिसून आला. प्रत्येक पॅव्हेलियनकडे नजर टाकली तर प्रत्येक िवगमध्ये पोलिसांशिवाय ५०-१०० प्रेक्षक दिसून आले. व्हीसीएने अल्प दरात बाद फेरीच्या सामन्यांची तिकिटे उपलब्ध करून दिलेली असतानाही प्रेक्षकांनी सामन्यांकडे का पाठ फिरवली?, हे मात्र कोडेच आहे. ८-१० मार्चला झालेल्या अफगाणिस्तानच्या सामन्यात मात्र अफगाणिस्तानहून आलेल्या समर्थकांनी आपली हजेरी लावली. पात्रता फेरी असूनही अफगाणिस्तानच्या समर्थकांनी आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज मदानात फडकवत सामन्यांचा आनंद लुटला अन् त्यामुळे त्या खेळाडूंना बळ मिळाले. त्यांना दोन्ही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.

स्थानिक प्रेक्षकांच्या या तुरळक गर्दीनेही दोन्ही संघांचा उत्साह वाढवला. यात शाळकरी मुलांचा समावेश होता. आयसीसीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्टेडियमच्या आत ढोलताशाची सोय केली आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साह कायम राहण्यास ‘डीजे’संगीत देखील वाजवले जाते. नागपूरकरांची चव ओळखून अस्सल मराठी गीते शुक्रवारच्या सामन्यात वाजवण्यात आली. सध्या लोकप्रिय ठरत असलेले ‘शांताबाई’, ‘माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ अशी गीते मनोरंजनासाठी वाजवली गेली. अल्पश आलेल्या प्रेक्षकांनीही त्यावर ठेका धरत संगीताचा आनंद लुटला. मात्र, मोठय़ा प्रमाणात मनोरंजनाची सोय असूनही स्टेडियमकडे प्रेक्षकांची पाठ का?, याचे उत्तर अद्याप गवसलेले नाही.

आता १५ मार्चला भारत विरुध्द न्यूझीलंड, असा पहिला सुपर टेनमधील पहिला सामना रंगणार आहे.१५ मार्चला भारत विरुध्द न्यूझीलंड, असा पहिला सुपर टेनमधील पहिला सामना रंगणार आहे. यात स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ होण्याची दाट शक्यता व्हीसीएकडून वर्तवली आहे. मात्र, ज्या भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो तेथे भारताच्या सामन्यांशिवाय गर्दी का होत नाही, हा प्रश्न मात्र कायम आहे.