विश्वविजेत्या प्रशांत मोरे (रिझव्‍‌र्ह बँक) याने पहिला सेट गमावूनही चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवे याचे आव्हान परतवून लावत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.

जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या एस. अपूर्वा (एलआयसी) हिने माजी विश्वविजेती रश्मी कुमारी (पेट्रोलियम क्रीडा मंडळ) हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले.

श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी रात्री रंगलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीपने पहिला सेट २५-१६ असा जिंकत प्रशांतसमोर कडवे आव्हान उभे केले. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रशांतने हार न मानता पुढील दोन्ही सेट सहजपणे जिंकत राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याने ही लढत १६-२५, २५-१०, २७-७ अशा फरकाने जिंकली.

महिलांमध्ये दोन्ही विश्वविजेत्या खेळाडू अंतिम फेरीत आमने-सामने आल्यामुळे या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण अपूर्वाने २५-११, २५-११ अशा फरकाने रश्मीचा प्रतिकार मोडून काढला. विशेष म्हणजे, अपूर्वाने स्पर्धेतील सर्व सामने दोन सेटमध्ये जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानने तमिळनाडूच्या सुरेंद्र बाबू याचा १८-१४, २५-० असा सहज पराभव करून वर्चस्व गाजवले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शोभा कामतने महाराष्ट्राच्याच माधुरी तायशेटेचा २५-०४, २५-१३ असा सहज पराभव करून सातव्या राष्ट्रीय अजिंक्यपदाची नोंद केली.