पुरुषांमध्ये कोल्हापूर तर महिलांमध्ये कर्नाटकशी सामना

उस्मानाबादमधील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या २७ व्या फेडरेशन चषक खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी दिमाखात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या पुरुषांचा अंतिम सामना कोल्हापूरबरोबर तर महिलांचा कर्नाटकशी रंगणार आहे.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कर्नाटकवर ९-६ अशी ३ गुणांनी डावात मात केली. महेश िशदेने कर्णधारपदाला साजेशा खेळी केल्या. त्याला दीपेश मोरे, अक्षय गणपुले व मििलद चावरेकरने उत्तम साथ दिली. दुसऱ्या लढतीत विजय हजारे, सागर पोतदार व उमेश सातपुते यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर कोल्हापूरने तेलंगणाचा १०-९ असा एक डावाने सहज पराभव केला.

महिलांच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राने दिल्लीचे आव्हान १०-६ असे एक डाव आणि ४ गुणांनी मोडीत काढले. महाराष्ट्राच्या सारिका काळेने आक्रमणात ३ गडी टिपले. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रियांका भोपी, श्रुती सकपाळ, कर्णधार आरती कांबळे व ऐश्वर्या सावंत यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्या रोमहर्षक उपांत्य लढतीत कर्नाटकने केरळचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. अलाहिदा डावात कर्नाटकची एका गुणाने सरशी झाली व त्यांनी १२-११ अशा फरकाने सामना जिंकला. वीणा एम. ही कर्नाटकच्या विजयाची शिल्पकार ठरली.