ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॉकीला भारताच्या राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ओडीशात हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन पटनाईक यांनी मोदींकडे मागणी केल्याचं समजतंय. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.

“माननीय मोदीजी, आपल्याला माहिती असेलच की हॉकीचा विश्वचषक येत्या नोव्हेंबर महिन्यात ओडीशामध्ये भरवला जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान तरुणांमध्ये असणारं हॉकीचं वेड मी अनुभवतो आहे. आतापर्यंत हॉकीने भारतीय चाहत्यांना जेवढे आनंदाचे क्षण दिले आहेत, तेवढं आपण हॉकीसाठी काहीच करु शकलो नाहीत. यासाठी मी हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याची मागणी करतो आहे.” अशा आशयाचा मजकूर पटनाईक यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या काळात भारतीय हॉकीने जगावर राज्य केलं होतं. मात्र काळाच्या ओघात भारतीय हॉकी मागे पडली. मध्यंतरीच्या काळात हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचा चुकीचा समज लोकांमध्ये होता. मात्र ऐश्वर्या पराशर नावाच्या मुलीने माहिती अधिकाराखाली राष्ट्रीय खेळाबद्दल माहिती मागितली होती. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने कोणत्याही खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्यात आलेला नसल्याचं सांगितलं.