अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलच्या २९व्या कसोटी शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ३६७ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १५६ धावा झाल्या आहेत. ६ बाद २८९ वरून पुढे खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने ७८ धावांची भर घातली. ११ चौकारांसह चंद्रपॉलने नाबाद १२२ धावांची खेळी साकारली. दिनेश रामदिनने १०७ धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे टीम साऊदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पीटर फुल्टन ११ तर हॅमीश रुदरफोर्ड १० धावा करून तंबूत परतला. मात्र यानंतर केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ५८ धावांवर विल्यमसनला सुनील नरिनने बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रॉस टेलर ५६ तर ब्रेंडान मॅक्क्युलम ११ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडचा संघ २११ धावांनी पिछाडीवर आहे.

चंद्रपॉलचा विक्रम
चंद्रपॉलने कारकिर्दीतील २९वे कसोटी शतक साजरे केले. या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतील अ‍ॅलन बॉर्डर यांचा विक्रम मागे टाकला. चंद्रपॉलच्या नावावर आता १५३ कसोटी सामन्यांमध्ये ११,१९९ धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चंद्रपॉल आता सहाव्या स्थानी आहे. चंद्रपॉलने नाबाद शतकांचा विक्रमही नावावर केला. नाबाद शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले आणि या यादीत तो आता सहाव्या स्थानी आहे.