भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. पण धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी विराटला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे स्वत: विराटने सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी विराटने आपल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की मी २०२२पर्यंतच्या क्रिकेटचाच विचार करतो. त्यानंतर विराटनंतर भारताचा कर्णधार कोण? अशी चर्चा रंगली होती, पण विराटच्या अनुपस्थितीत रोहितने संघाचे नेतृत्व केल्याने तोच पुढील कर्णधार असेल असं साऱ्यांचं मत पडलं. पण भारतीय समालोचक आकाश चोप्रा याने मात्र वेगळेच मत व्यक्त केलं आहे.

“विराट आणि रोहित यांच्याबाबत बोलायचं झालं तर दोघेही एकाच वयोगटातील खेळाडू आहेत. त्यामुळे एका क्षणी असं वाटेल की ते कर्णधारपदासाठी साजेसे नाहीत. अशा वेळी कर्णधार म्हणून विराटचा वारसदार लोकेश राहुल बनू शकतो. पंजाब संघासाठी त्याला कर्णधारपद मिळालं आहेच. नेतृत्व करण्याची त्याची पद्धत चांगली असेल अशी मला अपेक्षा आहे. खरं तर या IPLमध्येच आपल्याला त्याच्या नेतृत्वकौशल्याची कल्पना येईल”, असे आकाश चोप्रा म्हणाला.

“कर्णधार कितीही यशस्वी असला, तरी प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा क्षण येतोच जेव्हा त्याला आपल्या वारसदाराची निवड करावी लागते. महेंद्रसिंग धोनीने आपला उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर दिली. तसेच कोहलीलादेखील त्याच्या कारकिर्दीत कधी ना कधी करावंच लागेल. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मला असं वाटतं की तो जबाबदारी राहुलच्या खांद्यावर दिली जाईल”, असे आकाश चोप्राने स्पष्ट केलं.