अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी क्रिकेटला आलविदा केला होता. विशेष म्हणजे सचिननं १५ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरोधातत पदार्पण केलं होतं. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत सचिन तेंडुलकरनं अखेरचा कसोटी सामना खेळला होता. वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या विंडिज विरोधातील सामन्यात सचिनने ७४ धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता.

सचिन तेंडुलकर भारतामध्ये क्रिकेटला धर्मात परावर्तित केले. सचिननं क्रिकेटमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्याचे विक्रम आणि खेळाप्रती निष्टा पाहून चाहत्यांनी त्याला ‘क्रिकेटचा देव’ अशी पदवी बहाल केली.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक विक्रम त्याच्या नावावर जमा होते. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ३४,००० हून अधिक धावा केल्या. २०० कसोटी सामने खेळणारा सचिन तेंडुलकर एकमेव खेळाडू आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यात ५१ शतकांच्या मदतीनं १५ हजार ९२१ धावा काढल्या आहेत. तर ४६३ एकदिवसीय सामन्यात ४९ शतकांच्या मदतीनं सचिनने १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ३४ हजारांपेक्षा जास्त धावा आहे.

सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तब्बल २४ वष्रे त्याने क्रिकेटवर राज्य केले. सुख-दु:खाचे अनेक चिरंतन क्षण त्याच्या खेळातून क्रिकेटरसिकांना मिळाले. समकालीन क्रिकेटमधील कोणीही क्रिकेटपटू त्याच्या आसपाससुद्धा नाही. प्रेरक हास्य, कुरळे केस, आदी वैशिष्टय़ जपणाऱ्या सचिनमध्ये क्रिकेटमधील अवर्णनीय ऊर्जा आणि गुणवत्ता सामावली होती.