तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेटचं पुनरागमन झालं. कराचीच्या मैदानावर पाकिस्तानी संघाने श्रीलंकेवर २६३ धावांनी मात करत मालिकेत १-० ने बाजी मारली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी सामना पावसामुळे रद्द झाला होता.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लहिरु कुमारा आणि लसिथ एम्बुलदेनिया यांनी भेदक मारा करत पाकचा पहिला डाव १९१ धावांच गुंडाळला. पहिल्या डावात बाबर आझम आणि असद शफीक यांनी अर्धशतकी खेळी करुन संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने पहिल्या डावात दिनेश चंडीमलच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर २७१ धावांपर्यंत मजल मारली. शाहीन आफ्रिदीने लंकेचा निम्मा संघ माघारी धाडला. त्याला मोहम्मद अब्बासने ४ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र पाहुण्या संघाने ८० धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. सलामीवीर शान मसुद, आबिद अली, कर्णधार अझर अली आणि बाबर आझम यांनी शतकी खेळी करत संघाला ५५५ धावांपर्यंतचा टप्पा गाठून दिला. विजयासाठी ४७६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेच्या संघाने चांगली लढत दिली. ओशदा फर्नांडोने शतक तर निरोशन डिकवेलाने अर्धशतक झळकावत सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. नसीम शाहने दुसऱ्या डावात लंकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला यासिर शाह आणि शाहिन आफ्रिदी-मोहम्मद अब्बास आणि हारिस सोहिलने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.