२०१५ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा पाकिस्तानचा संघ २०१९ मध्ये पहिल्याच फेरीत गारद झाला. पाकिस्तानने ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले पण त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर प्रचंड टीका करण्यात आला. आता पुढील विश्वचषकापर्यंत पाकिस्तानचा संघ एका नव्या दमाच्या आणि सुसज्ज संघाला घेऊन मैदानात उतरेल, असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी विकत केला आहे. याच दरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडूने सर्फराजला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत वक्तव्य केले आहे.

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाचे लक्ष सामना जिंकण्याकडे कमी आणि दिवसाढवळ्या स्वप्न पाहण्याकडे अधिक होते. अशा परिस्थितीमध्ये सर्फराज अहमदकडून कर्णधारपद काढून घेण्यात जास्त वेळ घालवू नका. कर्णधारपदाचा निर्णय हा पूर्णपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा असेल यात शंकाच नाही. पण बोर्डाने जुन्याच संघावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडून काही चमत्काराची अपेक्षा केली तर मात्र ते अयोग्य ठरेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य असुरक्षित आणि अंधःकारमय होईल, असे रोखठोक मत माजी पाक क्रिकेटपटू कामरान अकमल याने व्यक्त केले.

या आधीही अकमलने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीवर टीका केली होती. पाकिस्तानच्या संघाने विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली होती. आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी एकही सामना जिंकला नव्हता. विंडीज विरुद्धच्या सामन्यात तर पाकिस्तनाची पळता भुई थोडी झाली होती. त्यामुळे कोणावरही कोणतीही दया-माया दाखवता त्यांच्या कामगिरीची चौकशी आणि समीक्षा केली जावी असे अकमल म्हणाला होता.