बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डातील वादाचा फटका आता पाकिस्तानी खेळाडूंना बसणार आहे. बांगलादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमीत्त, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या Asia XI vs World XI या टी-२० संघात पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळणार नसल्याचं समजतंय. आयसीसीने या दोन्ही टी-२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिलेला आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गेली काही वर्ष क्रिकेट मालिका खेळवली गेली नाहीये. मध्यंतरी दोन्ही द्विपक्षीय मालिकेसाठी करारही झाला होता, मात्र पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने पुन्हा एकदा कडक पवित्रा घेत पाक क्रिकेट बोर्डाशी संबंध तोडले. याविरोधात पाकिस्तानी बोर्डाने आयसीसीकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

“कोणतेही पाकिस्तानी खेळाडू या मालिकेत नसतील. ५ भारतीय खेळाडू या सामन्यांमध्ये खेळतील. पाक खेळाडूंबद्दल बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणते ५ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील याचा निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली घेतील. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यासारख्या खेळाडूंना पाठवण्याची विनंती केली होती. मार्च महिन्यात हे दोन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.