पाकिस्तान-आफ्रिका कसोटी मालिका

पदार्पणवीर नौमान अली (५/३५) आणि यासिर शाह (४/७९) या फिरकीपटूंनी दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात गडी राखून धूळ चारली. आफ्रिकेने दिलेले ८८ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तानने चौथ्या दिवशीच गाठून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू नौमान आणि यासिर यांच्यापुढे आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. सलामीवीर एडीन मार्करम (७४) आणि ऱ्हासी व्हॅन डर दुसेन (६४) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १२७ धावांची भागीदारी रचूनही आफ्रिकेचा डाव १ बाद १७५ धावांवरून ६ बाद १९२ असा कोसळला.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम (३०) आणि अझर अली (नाबाद ३१) यांनी पाकिस्तानसाठी मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात शतक साकारणारा फवाद आलम सामनावीर ठरला. मालिकेतील दुसरी कसोटी ४ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.