आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासोबतच बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट सुरु करण्याच्या दृष्टीकोनातूनही पहिलं पाऊल टाकलं आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये ६० वर्षावरील क्रिकेट प्रशिक्षकांना सरावसत्राला हजेरी लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र भारताचे माजी खेळाडू आणि बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांना हा निर्णय मान्य नाहीये. अरुण लाल यांचं वय ६५ आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालचा संघ रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे लाल यांना सरावसत्राला हजेरी लावता येणार नाहीये.

अवश्य वाचा – द्रविड ‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाचा प्रमुख?

“नरेंद्र मोदींचं वय ६९ आहे आणि तरीही ते सध्याच्या काळात देशाचा कारभार चालवतायत. तुम्ही त्यांनाही निवृत्त व्हायला सांगणार आहात का?? माझं वय ६५ आहे म्हणून मी स्वतःला घरात कोंडून घेणार नाहीये. मी बंगालच्या संघाचा प्रशिक्षक आहे की नाही हा मुद्दा इथे गौण आहे. एक माणूस म्हणून मी पुढची ३० वर्ष घरात स्वतःला कोंडून घेणार नाही. मला जसं हवंय तसं आयुष्य मी जगेन. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं महत्वाचं असलं तरीही बीसीसीआयने ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी नियम बनवला असला तरीही मी त्याचं पालन करणार नाही.” अरुण लाल यांनी आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – वयचोरीच्या कबुलीला माफी!

जसे इतर लोकं काळजी घेत आहेत तसंच मी देखील माझी काळजी घेईन. डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायजरने हात धुणं, मास्क लावणं यासारखे सर्व नियम मी पाळणार आहे. पण केवळ माझं वय ६० च्या पुढे आहे म्हणून मी स्वतःला विनाकारण क्वारंटाइन करणार नाही. विषाणूला ५९ आणि ६० वर्षातल्या व्यक्तीतला फरक कळत नाही, असं लाल म्हणाले. काही वर्षांपूर्वी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करुन लाल यांनी यशस्वी पुनरागमन केलं. तब्बल १३ वर्षांनी बंगालचा रणजी संघ अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र अंतिम सामन्यात त्यांना सौराष्ट्राकडून हार पत्करावी लागली.