फारशा अनुभव नसलेल्या मुंबईसंघाविरुद्ध खेळताना राजस्थानने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर विनीत सक्सेना आणि ऋषीकेश कानिटकर यांनी शतके झळकावत आपल्या घरच्या मैदानात पहिल्या दिवसअखेर २ बाद २६९ अशी मजल मारली.
आपल्या पहिल्याच षटकात क्षेमल वायंगणकरने दोन चौकारांनिशी तडफदार सुरुवात करणाऱ्या सलामीवीर अंकित लाम्बाला (९) बाद करीत राजस्थानला पहिला धक्का दिला. पण या धक्क्य़ातून राजस्थानचा संघ कानिटकर आणि सक्सेना यांच्या शतकांमुळे फक्त सावरला नाही, तर चांगलाच उभारला आणि त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. सक्सेना-कानिटकर या अनुभवी जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची भागीदारी रचत मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण अखेर शतक झळकावल्यावर अंकित चव्हाणने कानिटरला बाद करीत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले, बाद होण्यापूर्वी कानिटकरने १७ चौकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी साकारली. कानिटकर बाद झाल्यावर सक्सेनाने रॉबिन बिश्तच्या (खेळत आहे १४) साथीने पहिला दिवस शांतपणे खेळून काढायचे काम चोख बजावले. सक्सेनाने सलामीवाराला साजेसा संयमी खेळ करीत १५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ११४ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव ) : ९० षटकांत २ बाद २६९ (ऋषीकेश कानिटकर ११९, विनीत सक्सेना खेळत आहे ११४; अंकित चव्हाण १/३५).