सोची (रशिया) : भारताचे ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, बी. अधिबान आणि निहाल सरिन यांनी ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

१५ वर्षीय प्रज्ञानंदने दोन डावांच्या या लढतीत अमेरिकेच्या अनुभवी गॅब्रियल सर्जिसियान याला २-० असे नमवत आगेकूच केली. त्याला पुढील फेरीत पोलंडच्या मायकल क्रासेनकोव्ह याच्याशी लढत द्यावी लागेल. अधिबान याने पॅराग्वेच्या नेऊरिस रामिरेझ याच्यावर २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात २२ धावांनी विजय मिळवल्यानंतर अधिबानला दुसऱ्या डावातील विजयासाठी ५८ चालींपर्यंत संघर्ष करावा लागला. त्याला तिसऱ्या फेरीत विदित गुजराथी-अलेक्झांडर फिएर यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल.

विदित आणि अलेक्झांडर यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली असून शनिवारी टायब्रेकमध्ये विजेत्याचा फैसला होईल. १७ वर्षीय निहालने सनन जुगिरोव्ह याचे आव्हान १.५-०.५ असे परतवून लावले. पी. इनियनला टोमाशेव्हस्कीकडून ०-२ अशी हार पत्करावी लागली.

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा