न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाने पहिल्याच सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. दुखापतीमधून सावरत संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉचं शतक आणि गोलंदाजीत इशान पोरेल-कृणाल पांड्याच्या माऱ्यामुळे भारताने पहिल्या वन-डे सामन्यात १२ धावांनी विजय मिळवला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताने सुरुवात चांगली केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने कर्णधार शुभमन गिलच्या साथीने संघाचा डाव सावरला. मात्र ठराविक अंतराने गिल आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं शतक पूर्ण करत भारताची बाजू वरचढ ठेवली. १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने पृथ्वी शॉने १५० धावा केल्या. गिब्सनच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. यानंतर मधल्या फळीत विजय शंकरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ३७२ पर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडच्या संघाची सुरुवातमात्र अडखळती झाली. सलामीवीर केटन क्लार्क स्वस्तात माघारी परतला. इशान पोरेलेने त्याला माघारी धाडलं. पाठोपाठ जोश क्लार्कसनही माघारी परतल्यामुळे न्यूझीलंड संकटात सापडला. मात्र यानंतर, जॅक बॉयल आणि फिन अ‍ॅलन यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. यादरम्यान बॉयलने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचे मधल्या फळीतले फलंदाज मोक्याच्या क्षणी धावा जमावण्यात अपयशी ठरले. अखेरीस १२ धावांनी सामना जिंकत, भारतीय संघाने मालिकेची दमदार सुरुवात केली. भारताकडून इशान पोरेल-हार्दिक पांड्याने प्रत्येकी २-२ तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने १-१ बळी घेतला.