मुंबईचा करोडपती खेळाडू रिशांक देवाडिगाचा निर्धार

मुंबई : प्रो कबड्डीच्या लिलावात यूपी योद्धा संघाने माझ्यावर तब्बल एक कोटी ११ लाख रुपयांची बोली लावली, यावर अजूनही विश्वास बसत नाही. हे सारे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. या स्वप्नपूर्तीतूनच आता माझ्या स्वत:च्या, हक्काच्या घराचे स्वप्नही साकारणार आहे.. हे सांगताना रिशांक देवाडिगा याच्या डोळ्यांसमोर बहुधा त्याचा भूतकाळ उभा राहिला असावा. प्रो कबड्डीच्या लिलावात कोटय़धीश झालेल्या सहा कबड्डीपटूंमध्ये मुंबईच्या एकमेव रिशांकचा समावेश आहे.

सांताक्रूझच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर यशवंतनगर परिसर आहे. याच ठिकाणी १० बाय १२ चौरस फुटांच्या घरात रिशांक लहानाचा मोठा झाला. चार वर्षांपूर्वी प्रो कबड्डीच्या लिलावातून रिशांकला (यू मुंबा) सव्वापाच लाख रुपये मिळाले आणि त्याचे आयुष्य पालटले. त्याने या बैठय़ा घरांच्या वस्तीतून कलिना येथे एक छानसा फ्लॅट भाडय़ाने घेतला. आता मात्र आयुष्यातील संघर्ष संपवून लवकरच स्वत:च्या मालकीचे घर खरेदी करू, अशी प्रतिक्रिया रिशांकने व्यक्त केली.

‘‘प्रो कबड्डीने मला करोडपती केले. हे आता सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे मला अभिनंदनाचे बरेच फोन आणि मेसेजेस येत आहेत. कबड्डीने हे सोनेरी दिवस दाखवले, त्याचा अतिशय अभिमान वाटतो आहे. आई आणि बहीण यांच्या आनंदाला तर पारावार नाही,’’ असे रिशांकने सांगितले.

रिशांकचे बालपण गरिबीत गेले. पावसाळ्यात त्याचे बैठे घर जलमय होणे त्या वेळी नेहमीचेच होते. तो तीन वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले. आई पार्वतीबाई यांनी मग ब्युटी पार्लरमध्ये नोकरी स्वीकारत रिशांक व त्याच्या बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. कबड्डीची आवड रिशांकला लहानपणापासूनच होती. वाकोला परिसरातील मुलांसोबत तो सागर क्रीडा मंडळाकडून कबड्डी खेळू लागला. मात्र हाच खेळ पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला वेगळे वळण देईल, याची सुतराम कल्पना कुणालाही नव्हती.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बारावी पास झाल्यावर रिशांकने लीला हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली. सुटीच्या दिवशी कबड्डी खेळायचे, असा शिरस्ता मात्र त्याने आवर्जून जपला.

उपनगरातील एका सामन्याप्रसंगी प्रताप शेट्टी यांच्या तो नजरेत भरला. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रिशांकचा कबड्डीचा प्रवास सुरू झाला. मग ठाण्यातील एका स्पर्धेत प्रशिक्षक राजेश पाडावे यांनी त्याच्यापुढे देना बँकेकडून शिष्यवृत्ती स्वरूपात कबड्डी खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. पाच हजार रुपये मानधन आणि खेळायचेसुद्धा यामुळे हा प्रस्ताव त्याने त्वरित स्वीकारला. मग काही काळाने फक्त कबड्डी खेळून आयुष्याचे चीज होते का हे पाहू, असा निर्धार केला. प्रतिकूल परिस्थिती असूनही दुर्दम्य आशावाद असेल तर जग जिंकता येते, याचीच प्रचीती रिशांकच्या कारकीर्दीकडे पाहिल्यावर येते. पुढे गेले पाच हंगामांत तो प्रो कबड्डीचे व्यासपीठ गाजवत आहे. काही महिन्यांपूर्वी रिशांकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ११ वर्षांनंतर राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली होती.

कबड्डीतील या यशाचे श्रेय कुणाला देशील, या प्रश्नाला उत्तर देताना रिशांक म्हणाला, ‘‘सदैव खंबीरपणे पाठीशी राहणारी माझी आई आणि या वाटचालीत साथ देणारे प्रशिक्षक यांना यशाचे श्रेय जाते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मी मनामध्ये जोपासले आहे.