गेल्या १२ महिन्यांत ऑस्ट्रेलिया संघाने स्थित्यंतर घडवून आणत आश्चर्यकारक प्रगती केली आहे, याचा कर्णधार आरोन फिंचला अभिमान वाटत आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकातील सर्वात सुमार कामगिरी नोंदवली, असेही त्याने मान्य केले. तो म्हणाला, ‘‘गेल्या १२ महिन्यांत आम्ही सांघिक कामगिरीमध्ये बरीच प्रगती केली आहे. ज्या परिस्थितीतून आम्ही बाहेर पडलो, त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. आम्ही सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या स्थितीत होतो, पण ज्याप्रकारे आमचे आव्हान संपुष्टात आले ते निराशाजनक आहे. ही आमची सर्वात वाईट कामगिरी ठरली.’’‘‘इंग्लंडने सर्व आघाडय़ांवर चांगला खेळ केला. पहिल्या १० षटकांतच आम्ही सामना गमावला होता. पण स्टीव्ह स्मिथ आणि अ‍ॅलेक्स केरी यांच्या शतकी भागीदारीमुळे आम्हाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पण इंग्लंड आक्रमक फलंदाजीचा नमुना पेश करणार, याची आम्हाला कल्पना होती. जेसन रॉयच्या धडाकेबाज खेळीमुळे आमच्या आव्हानातील हवाच संपून गेली,’’ असे फिंचने सांगितले.