चेन्नई चॅलेंजर टेनिस स्पर्धा

ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित अँड्रय़ू हॅरिसने भारताचा अव्वल टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनला तर कोएर्टिन मोटेटने शशीकुमार मुकुंदला उपांत्य फेरीतच पराभूत केल्याने चेन्नई खुल्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हॅरिसने प्रज्ञेशला तीन सेटच्या लढतीत ६-४, ३-६, ६-० असे पराभूत केले. हॅरिसने यापूर्वी कनिष्ठ गटातील विम्बल्डन आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्या अनुभवातून पुढे आलेल्या हॅरिस उपांत्य सामन्यातील पहिल्या सेटमध्ये प्रज्ञेशची एक सव्‍‌र्हिस भेदत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेशने दमदार पुनरागमन करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेशला निष्प्रभ करीत हॅरीसने सामना खिशात घातला.

मोटेटने मुकुंदला ६-३, ४-६, २-६ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. पहिला सेट मुकुंदने जिंकल्याने त्याच्यासह भारतीयांच्या आशा जागृत झाल्या. मात्र त्यानंतरचे दोन्ही सेट सलगपणे जिंकून घेत मोटेटीने स्पर्धेतील भारताच्या आशेवर पाणी फिरवले.