Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४०हून जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून याबाबत तीव्र पडसाद उमटले. या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तनाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नका अशी मागणी केली जात आहे. या दरम्यान माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

इम्रान खान आणि सुनील गावसकर हे दोघे एकाच पिढीतील क्रिकेटपटू आहेत. त्यांनी मैदानावर अनेकदा एकमेकांसमोर क्रिकेट खेळले आहे. तसेच या दोघांमधील मैत्रीदेखील साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे भारताला डिवचणाऱ्या इम्रान खानला आपण मित्रत्वाचा सल्ला द्यावा का? असा प्रश्न सुनील गावसकर यांना पडला आहे.

दोन राष्ट्रांमधील मित्रभाव टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पहिले पाऊल उचायला हवे, असा मित्रत्वाचा सल्ला मी त्यांना द्यावा का? जर इम्रान खानने यांनी तसे केले, तरच भारत आपल्याकडून त्यावर प्रतिक्रिया देईल. इम्रान खान यांनीच त्यांचा ‘नवा’ पाकिस्तान देश कसा आहे, हे दाखवून द्यावे. आता निर्णय सर्वस्वी त्यांच्या हाती आहे, असे गावसकर म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानविरोधात क्रिकेटपटू मोहम्मद शमी, युझवेन्द्र चहल, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, गौतम गंभीर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.