या वर्षी आयपीएल ९ एप्रिल ते २९ मे दरम्यान रंगणार
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये आयपीएलमध्ये कुठले दोन नवीन संघ येणार, याची उत्सुकता होती. पण या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला असून पुणे आणि राजकोट असे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या गव्हर्निग कौन्सिलच्या बैठकीमध्ये या वेळी स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मेदरम्यान खेळवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
कोलकाताचे उद्योगपती संजीव गोएंका यांनी पुण्याची फँ्रचायझी विकत घेतली आहे, तर इन्टेक्स या मोबाइल कंपनीने राजकोटची फँ्रचायझी मिळवण्यात बाजी मारली. फँ्रचायझीच्या वितरणासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सोमवापर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. या वेळी २१ कॉर्पोरेट कंपन्यांनी फँ्रचायझींसाठी निविदा पाठवल्या होत्या. यामध्ये स्टार इंडिया, व्हिडीओकॉन, आयपीजी समूह, सायकल अगरबत्ती या कंपन्यांचा समावेश होता. त्याचबरोबर बॉलीवूडमधील निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनीही फँ्रचायझीसाठी निविदा पाठवली होती. या सर्व निविदांवर विचार करून या दोन फँ्रचायझींचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही संघांसाठीचा लिलाव १५ डिसेंबरला होणार आहे. या लिलावात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, ब्रेंडन मॅक्क्युलम, फॅफ डय़ू प्लेसिस या नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश असेल.
या फँ्रचायझीसाठी गोएंका यांनी एका वर्षांचा करार केला असून त्यासाठी त्यांना १० कोटी रुपये मोजावे लागले. तर इन्टेक्स मोबाइलने दोन वर्षांचा करार केला असून त्यासाठी त्यांना १६ कोटी रुपये मोजावे लागले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये नवीन फ्रँचायझींची घोषणा केली, या वेळी दोन्ही फँ्रचायझींचे मालकही उपस्थित होते.
२०१३ साली आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही संघ दोषी आढळले होते. त्यामुळे या दोन्ही संघांवर दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
चेन्नई आणि राजस्थान या संघांतील खेळाडूंना दोन गटांमध्ये विभागण्यात येणार आहे. या वेळी या दोन नवीन फँ्रचायझींना खेळाडूंना संघात घेण्यासाठी किमान ४० कोटी आणि कमाल ६६ कोटी रुपयांची बोली लावता येईल. जे खेळाडू या प्रक्रियेमध्ये निवडले जाणार नाहीत, त्यांना बंगळुरू येथे ६ फेब्रुवारीला होणाऱ्या साधारण लिलावात सहभागी करता येणार आहे.

मुंबईत उद्घाटन सोहळा आणि सलामीची लढत
या वेळी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि सलामीची लढत मुंबईमध्ये होणार आहे. ८ एप्रिलला आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार असून पहिला सामना ९ एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.