पात्रता शर्यतीत २ मिनिटे २५.७३ सेकंदाची जलद वेळ

मुंबईत पहिल्यांदाच  होत असलेल्या पी-वन पॉवरबोट इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीने अडथळय़ांच्या मार्गावर मात करत नवा इतिहास लिहिला. रविवारी पार पडणाऱ्या मुख्य शर्यतीसाठीच्या पात्रता फेरीचा पहिला दिवस गाजवला तो बुस्टर जेट्सच्या सॅम कोलमन आणि डेजी कोलमन या भाऊ-बहिणीने.

शुक्रवारी पार पडलेल्या पात्रता शर्यतीत या जोडीने २ मिनिटे २५.७३ सेकंदाची वेळ नोंदवून मुंबईच्या समुद्रावर वर्चस्व गाजवले. मार्लिन्सच्या जेम्स नॉव्‍‌र्हिल आणि ख्रिस्टियन पॅर्सन-यंग या जोडीने २ मिनिटे २५.७४ सेकंदात दुसरे, तर माव्‍‌र्हेरिक्सच्या जॉन डोनेली आणि केव्हिन बुडरेक यांनी २ मिनिटे २६.६३ सेकंदात तिसरे स्थान पटकावले.

भारताच्या गौरव गिल आणि सी. एस. संतोष यांनी आपापल्या संघाकडून चांगली कामगिरी करताना अनुक्रमे सातवे व नववे स्थान पटकावले. उल्ट्रा शार्क्सच्या गौरवने जॉर्ज आव्हेयसह २ मिनिटे ३०.६७ सेकंदाची, तर बुस्टर जेट्सच्या संतोषने मार्टिन रॉबिन्सनसह २ मिनिटे ३१.५४ सेकंदाची वेळ नोंदवून ५.२ किमीचे अंतर पार केले.

फर्नान्डो टोरेसची प्रकृती स्थिर

माद्रिद : अ‍ॅटेलटिको माद्रिद संघाचा खेळाडू फर्नान्डो टोरेस याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रावरील चिंतेचे वातावरण दूर झाले आहे. दोन खेळाडूंच्या टकरीत टोरेसच्या मेंदूस दुखापत झाली आहे. मात्र सीटी स्कॅन केल्यानंतर ही दुखापत खूप गंभीर नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

टोरेसची डेपोतरेटिवोचा खेळाडू अ‍ॅलेक्स बेर्गान्टिनोस याच्याशी जोरदार टक्कर झाली. ही टक्कर झाल्यानंतर टोरेस जमिनीवर कोसळला व बेशुद्ध झाला. ताबडतोब त्याला रुग्णालयात नेण्यात आले व तेथे त्याचे सीटी स्कॅनही करण्यात आले.

अ‍ॅटेलटिको संघाचा बचावरक्षक होजे मारिया गिमेंनेझने सांगितले, ‘‘स्कॅनचा अहवाल येईपर्यंत आम्ही खूप काळजीत पडलो होतो. आता अहवाल आल्यानंतर आम्ही सुस्कारा टाकला आहे. टोरेस याची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय उपचारांना तो साथ देत आहे. एक दोन दिवस त्याला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तो लवकरच मैदानावर खेळावयास येईल अशी आम्हाला खात्री आहे.’’

डेपोतरेटिवो संघाचा फ्लोरिन अँन्डोन याने पूर्वार्धात संघाचे खाते उघडले. उत्तरार्धात अ‍ॅटेलटिको संघाचा अन्तोईन ग्रिझेमन याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली.