इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

‘‘आम्हाला ‘आयपीएल’च्या सामन्यांची चिंता नाही, असे म्हटल्यास अयोग्य ठरेल. आम्ही सर्वोत्तम पद्धतीने स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज आहोत आणि यासंदर्भातील आव्हानांचीही आम्हाला जाणीव आहे. परंतु हे आमच्या नियंत्रणात नाही. टाळेबंदीची स्थिती उद्भवली, तर त्याच्याशी सामना करण्याची आम्ही तयारी केली आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने सांगितले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत. परंतु मुंबईत सराव करणाऱ्या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ ऑबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्ये निवासास आहे आणि घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

‘‘आम्ही ‘बीसीसीआय’ आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी बांधील आहोत. त्यामुळे सद्य:स्थितीबाबत चिंतेत असणे स्वाभाविक आहे. परंतु जे आमच्या नियंत्रणात नाही, त्याची काळजी करण्यात काहीच अर्थ नाही. सराव सत्र व्यवस्थित सुरू आहेत. टाळेबंदीचा संघ आणि सरावावर कोणताही परिणाम होणार नाही,’’ अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली.

‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून, मुंबईत पहिला सामना १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येईल.