News Flash

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदालचा संघर्षपूर्ण विजय

दुसऱ्या सेटमध्ये नदालला परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही.

| January 22, 2018 01:55 am

राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

दिमित्रोव, चिलीच, एडमंडसह उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल

ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मार्गातील अवघड अडथळे पार करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय ग्रिगोर दिमित्रोव, मरीन चिलीच व काईल एडमंड यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली.

नदालने जवळपास चार तासांच्या लढतीनंतर श्वार्ट्झमनला ६-३, ६-७ (४-७), ६-३, ६-३ असे हरवले. दुसऱ्या सेटमध्ये नदालला परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिसऱ्या सेटमध्ये श्वार्ट्झमनला पाच वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती. पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. हा सामना जिंकल्यामुळे जागतिक क्रमवारीतील त्याचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. त्याच्यापुढे चिलीच याचे आव्हान असणार आहे. क्रोएशियाच्या चिलीचने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा ६-७ (२-७), ६-३, ७-६ (९-७), ७-६ (७-३) असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. इंग्लंडच्या एडमंडने इटलीच्या आंद्रेस सेप्पीवर ६-७ (४-७), ७-५, ६-२, ६-३ अशी मात केली. तिसऱ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. टायब्रेकपर्यंत सेट न्यायचा व तो जिंकायचा अशीच रणनीती उपयोगात आणत दिमित्रोवने हा सामना ७-६ (७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-४) असा जिंकला.

पेस-राजा पराभूत ; मिश्र दुहेरीत बोपण्णाची आगेकूच

मेलबर्न : भारताच्या लिएण्डर पेस व पुरव राजा यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत त्यांना कोलंबियाच्या जुआन सेबॅस्टियन कबाल व रॉबर्ट फराह यांनी ६-१, ६-२ असे एकतर्फी पराभूत केले. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या रोहन बोपण्णाने हंगेरीच्या तिमिया बाबोसच्या साथीने दुसरी फेरी गाठली.

उपउपांत्यपूर्व फेरीत ११व्या मानांकित जुआन व रॉबर्ट यांनी केवळ एक तास, नऊ मिनिटांमध्ये हा सामना जिंकला. जुआन व रॉबर्ट यांना १० वेळा सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली. त्यापैकी चार वेळा त्यांनी या संधींचा लाभ घेतला. दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी दोन वेळा त्यांनी सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. पेस व राजा यांना पहिल्या सेटमध्ये दोन वेळा तर दुसऱ्या सेटमध्ये तीन वेळा सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली होती.बोपण्णा व बाबोस यांनी एलिन पेरेझ व अँड्रय़ू वॉशिंग्टन या अमेरिकन जोडीवर मात केली. त्यांनी केवळ ५३ मिनिटांमध्ये हा सामना ६-२, ६-४ असा जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2018 1:55 am

Web Title: rafael nadal beats diego schwartzman in australian open 2018
Next Stories
1 वोझ्नियाकी उपांत्यपूर्व फेरीत
2 वडिलांच्या प्रेरणेमुळे अपयशावर मात करू शकले!
3 अंध क्रिकेट संघाची कामगिरी प्रेरणादायी – केदार जाधव
Just Now!
X