महाराष्ट्राच्या मल्लांना राष्ट्रीय स्तरावर कोणीही वाली नाही, याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. कुस्तीतील राजकारणामुळे ऑलिम्पिक पदकाचे आशास्थान असलेला राहुल आवारेला ऑलिम्पिक पात्रता फेरीपासून वंचितच ठेवण्यात आले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विविध ठिकाणी पात्रता फेरीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. कझाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या पात्रता स्पर्धेत राहुलला कांस्यपदक मिळाले होते, मात्र त्या स्पर्धेतील फक्त पहिले दोन क्रमांक मिळविणारेच खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. त्यामुळे तेथे राहुलला पात्रता पूर्ण करता आली नाही. मंगोलियात सध्या पात्रता स्पर्धा सुरू आहे. राहुल फ्रीस्टाईलमधील ५७ किलो गटात सहभागी होत असतो. याच गटात संदीप तोमरला मंगोलियातील स्पर्धेत भाग घेण्यास भारतीय कुस्ती महासंघाने पाठविले आहे. या स्पर्धेतील पहिले तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र होणार आहेत. साहजिकच राहुलला या स्पर्धेद्वारे पात्रता पूर्ण करण्याची हुकमी संधी होती. मात्र राहुलला डावलण्यात आले. मंगोलियात पाठवण्यात आलेल्या संदीप तोमरला राहुलने अनेक वेळा पराभूत केले आहे.
तुर्कस्तानमध्ये ६ ते १० मे या कालावधीत आणखी एक पात्रता स्पर्धा होणार आहे. तेथे पहिले दोनच खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. जर मंगोलियातील स्पर्धेत तोमरने पात्रता पूर्ण केली तर राहुलला तुर्कस्तानातील स्पर्धेत भाग घेऊनही ऑलिम्पिकपासून वंचित राहावे लागणार आहे. कारण एका वजनी गटात एकच खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो. राहुल याने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. कुस्तीच्या पहिल्या प्रो लीगमध्येही त्याची निवड झाली होती.

महाराष्ट्राला वाली नाही – पवार
राहुल याचे मार्गदर्शक व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी सांगितले, ‘ऑलिम्पिक स्पर्धेबाबत महाराष्ट्राच्या मल्लांना डावलले जाण्याची परंपरा जुनीच आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे मल्ल पदकांची लयलूट करीत असतात. मात्र ऑलिम्पिक पात्रतेच्या वेळी आम्हा मल्लांना नेहमीच डावलले गेले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रीय मल्लांना कोणीही वाली नाही ही वस्तुस्थिती आहे.’’