राजस्थानची बंगळुरूशी लढत
ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डी’व्हिलियर्स असे ट्वेन्टी-२०चे दिग्गज फलंदाज असूनही यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाडी घसरलेलीच आहे. घरच्या मैदानावरही त्यांना पराभवालाच सामोरे जावे लागत आहे. आता त्यांचा मुकाबला आहे राजस्थान रॉयल्सशी.
विराट कोहलीचा खराब फॉर्म हा बंगळुरूसाठी चिंतेचा विषय आहे. गेल अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. युवराज सिंग अजूनही चाचपडताना दिसतोय. डी’व्हिलियर्सकडून बंगळुरूला मोठय़ा अपेक्षा आहेत. वरुण आरोन, अशोक िदडा आणि युझवेंद्र चहल या भारतीय त्रिकुटावर गोलंदाजीची धुरा आहे.
राजस्थान रॉयल्सला आता सूर गवसला आहे. शेन वॉटसन हा रॉयल्ससाठी हुकमी खेळाडू आहे. संजू सॅमसनकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. मुंबईकर फिरकीपटू प्रवीण तांबे बंगळुरूसाठी डोकेदुखी ठरू शकतो. जेम्स फॉकनर, स्टीव्हन स्मिथ आणि रजत भाटिया हे अष्टपैलू त्रिकूट राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरू शकते. बंगळुरूने आतापर्यंत पाच लढती गमावल्यामुळे बाद फेरीत मजल मारण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे. दुसरीकडे राजस्थान संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.