गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या छत्तीसगडविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवून गुणांचे खाते उघडले. चौथ्या दिवशी ३ बाद १४९ धावांवर महाराष्ट्राने दुसरा डाव घोषित केला. तेव्हा निकाल लागणे अशक्य असल्याने दोन्ही संघांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. छत्तीसगडला अवघा एक गुण मिळाला.

शुक्रवारच्या १ बाद ३९ धावांवरून पुढे खेळताना पहिल्या डावातील शतकवीर ऋतुराजने दुसऱ्या डावातही सहा चौकार आणि एका षटकारासह ७६ धावांची खेळी साकारली. तर ‘नाइट वॉचमन’ म्हणून आलेल्या सत्यजीत बच्छावनेसुद्धा (नाबाद ५२) अर्धशतक झळकावून छत्तीसगडच्या गोलंदाजांना हैराण केले. अखेरीस दिवसाची ५६ षटके महाराष्ट्राने फलंदाजी केल्यानंतर डाव घोषित केला. त्या वेळीच पंचांनी दोन्ही कर्णधारांचे मत विचारात घेऊन सामना अनिर्णित झाल्याचे घोषित केले.

सामन्यात एकूण १८६ धावा करणारा ऋतुराज सामनावीर ठरला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या महाराष्ट्राचे आता तीन सामन्यांतून तीन गुण झाले असून ३ जानेवारीपासून सेनादलाविरुद्ध त्यांचा पुढील सामना रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक

* महाराष्ट्र (पहिला डाव) : २८९

* छत्तीसगड (पहिला डाव) : २८६

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : ६९ षटकांत ३ बाद १४९ डाव घोषित (ऋतुराज गायकवाड ७६, सत्यजीत बच्छाव नाबाद ५२; सुमित रुईकर २/४४)

* सामनावीर : ऋतुराज गायकवाड</p>

* निकाल : सामना अनिर्णित (महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी)

* गुण : महाराष्ट्र ३, छत्तीसगड १