भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. धोनीने कोणताही गाजावाजा न करता फक्त इन्स्टाग्रामवर एक संदेश शेअर करून चाहत्यांना त्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली होती. ज्याप्रमाणे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले, त्याचप्रमाणे २०१४ मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आणि मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी त्याने त्याबद्दल संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली.

शास्त्रींनी धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा खुलासा त्यांच्या नवीन पुस्तक ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’मध्ये केला आहे. शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात, मेलबर्न कसोटी संपल्यानंतर (२६-३० डिसेंबर २०१४) अचानक धोनीने कसोटी क्रिकेट सोडल्याच्या दिवसाची संपूर्ण माहिती दिली आहे. शास्त्रींनी पुस्तकात लिहिले, ”धोनीच्या निर्णयाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. मालिकेतील तिसरी कसोटी मेलबर्नमध्ये खेळली जात होती. आम्हाला शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राखता आला. धोनीला पत्रकार परिषदेला जायचे होते. तिथे जाण्यापूर्वी त्याने मला सांगितले, की रवी भाई मी परतल्यावर मला माझ्या सहकारी खेळाडूंशी बोलावे लागेल. मग मी त्याला सांगितले की तू कर्णधार आहेस, तू बोलू शकतोस.”

शास्त्रींनी आपल्या पुस्तकात पुढे लिहिले, ”मी आणि धोनी पत्रकार परिषदेतून परतलो आणि त्याने हा माझा शेवटचा कसोटी सामना असल्याचे जाहीर केले. धोनी अशी व्यक्ती आहे. तो निर्भय आणि निस्वार्थी आहे. त्याने मालिकेत मध्येच एवढा मोठा निर्णय घेऊन हे सिद्ध केले होते.”

हेही वाचा – ENG vs IND : धैर्याला सलाम..! गुडघ्यातून रक्त वाहत असतानाही जेम्स अँडरसन करत होता गोलंदाजी

शास्त्री म्हणाले, ”तेव्हा धोनीने ९० कसोटी सामने खेळले होते. त्यावेळी धोनी क्रिकेट जगतातील सर्वात मोठा खेळाडू होता. त्याच्याकडे दोन वर्ल्डकप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद होते. त्याचा स्वतःचा फॉर्म चांगला होता आणि तो १०० कसोटींपासून फक्त १० सामने दूर होता. पण तरीही त्याने क्रिकेटला अलविदा म्हटले. मी धोनीला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. तो अजूनही संघातील तीन फिट खेळाडूंपैकी एक होता. त्याला आपली कसोटी कारकीर्द आणखी सुधारण्याची संधी होती”.

धोनीची कसोटी कारकीर्द

धोनीने भारतासाठी ९० कसोटीत ३८.०९च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. त्याने कसोटीत ६ शतके आणि ३३ अर्धशतके केली होती. या फॉरमॅटमध्ये त्याने २५६ सामने खेळले. तो भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६० पैकी २७ कसोटी जिंकल्या आहेत. विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.