* पदार्पणात धवनचे सर्वात जलद शतक
* तिसऱ्या दिवसअखेर भारत बिनबाद २८३; ऑस्ट्रेलिया सर्व बाद ४०८
* मिचेल स्टार्कचे शतक एका धावेने हुकले
कोण म्हणतं भारताकडे सर्वोत्तम सलामीची जोडी नाही? शिखर धवन आणि मुरली विजय यांनी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २८३ धावांची विक्रमी भागीदारी रचत टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली आहे. या दोघांनी सलामीसाठी साकारलेली ही भागीदारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. ८५ चेंडूंत जलद शतक झळकावणारा शिखर धवन आजच्या दिवसाचा मानकरी ठरला आहे. धवनने पदार्पणाच्या कसोटीत नाबाद १८५ धावांची लयलूट करत भारताला या सामन्यावर पकड मिळवून दिली आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४०८ धावांवर रोखल्यानंतर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांसमोर ऑस्ट्रेलियाचे सर्व गोलंदाज पुरते निष्प्रभ ठरले. चोहोबाजूला तुफान फटकेबाजी करणाऱ्या धवनने ३३ चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करत कांगारूंच्या गोलंदाजांची पिसे काढली. पहिला दिवस पावसाने ‘बॅटिंग’ केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या फलंदाजांनी तब्बल ४१८ धावा कुटल्या. चहापानानंतरच्या सत्रात भारताने १२७ धावांची लयलूट केली. धवनला सुरेख साथ देत विजयने १० चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ८५ धावांचे योगदान दिले.
पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद शतक झळकावून धवनने गुंडाप्पा विश्वनाथ यांनी १९६९-७०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचलेला १३७ धावांचा विक्रम मोडीत काढला. धवनने ऑफसाइडला सुरेख फटक्यांचा नजराणा पेश केला.
अचूक टायमिंग आणि सुरेख फटके लगावत धवनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्याची कोणतीही संधी दिली नाही. धवनला रोखणे कांगारूंना अखेपर्यंत जमले नाही. पहिल्या २३ षटकांत धवनने १९ चौकार लगावले.
तत्पूर्वी, मिचेल स्टार्क आणि स्टीव्हन स्मिथ यांची शतकी खेळी हुकली तरी त्यांनी ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. स्टार्कला एका धावेने शतक पूर्ण करता आले नाही, अन्यथा नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा तो ६६ वर्षांनंतरचा पहिला खेळाडू ठरला असता. स्टार्क आणि स्मिथ यांनी ९७ धावांची भर घालत या मैदानावरील आठव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी केली. स्टार्कने ९९ धावांच्या खेळीत १४ चौकार लगावले. दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या स्मिथने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत १० चौकार आणि एका षटकारासह ९२ धावा फटकावल्या.
 प्रग्यान ओझाच्या एका सुरेख चेंडूवर यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने त्याला यष्टिचीत केले. स्टार्क आणि नॅथन लिऑन यांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणून ठेवले होते. भारताकडून रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माने प्रत्येकी तीन, तर रविचंद्रन अश्विन आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

कसोटी पदार्पणाची कॅप प्रदान करतानाच सचिन तेंडुलकरने मला जिगरबाज खेळी करण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे मी ही खेळी साकारली. अर्धशतक आणि शतकाच्या जवळ गेल्यावर मी दडपणाखाली होतो. धावा करताना मी अजिबात घाईत नव्हतो. चौकार बसत गेले, फटक्यांची निवड योग्य होत होती आणि मला एक लय सापडली होती. भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मी माझ्या फलंदाजीवर प्रचंड मेहनत घेत होतो. मी स्वत:ला बदलले. मी एका संधीची वाट बघत होतो. जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिचे सोने करण्यात मी यशस्वी झालो याचे समाधान आहे. मला चांगले वाटते आहे. मी परमेश्वराचे आभार मानतो. पदार्पणात भरपूर धावा करता याव्यात असे माझे स्वप्न होते, ते साकार झाले. माझ्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या माझ्या पत्नीसाठी हा अतिशय भावुक क्षण होता.  
-शिखर धवन, भारताचा सलामीवीर

पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
खेळाडू    धावा    प्रतिस्पर्धी    वर्ष     ठिकाण    
शिखर धवन     १८५*       ऑस्ट्रेलिया      २०१३    मोहाली
गुंडाप्पा विश्वनाथ    १३७    ऑस्ट्रेलिया     १९६९     कानपूर
सौरव गांगुली    १३१    इंग्लंड    १९९६     लंडन
सुरिंदर अमरनाथ    १२४    न्यूझीलंड      १९७६     ऑकलंड
सुरेश रैना    १२०    श्रीलंका    २०१०    कोलंबो
लाला अमरनाथ    ११८    इंग्लंड    १९३३    बॉम्बे
अब्बास अली बेग    ११२    इंग्लंड    १९५९    मँचेस्टर    
दीपक शोधन    ११०    पाकिस्तान     १९५२     कलकत्ता
मोहम्मद अझरुद्दीन    ११०    इंग्लंड    १९८४     कलकत्ता
वीरेंद्र सेहवाग    १०५         दक्षिण आफ्रिका     २००१     ब्लोएमफौंटेन

सत्र    षटके    धावा/बळी
पहिले सत्र    ३८.५    १३८/३
दुसरे सत्र    २८    १५३/०
तिसरे सत्र    २८    १२४/०

तिसऱ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १४१.५ षटकांत सर्व बाद ४०८
भारत (पहिला डाव) : ५८ षटकांत बिनबाद २८३

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ईडी कोवन झे. कोहली गो. अश्विन ८६, डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. जडेजा ७१, मायकेल क्लार्क यष्टीचीत धोनी गो. जडेजा ०, फिल ह्युजेस झे. धोनी गो. ओझा २, स्टीव्हन स्मिथ यष्टीचीत धोनी गो. ओझा ९२, ब्रॅड हॅडिन त्रिफळा गो. शर्मा २१, मोझेस हेन्रिक्स त्रिफळा गो. शर्मा ०, पीटर सिडल पायचीत गो. जडेजा ०, मिचेल स्टार्क झे. धोनी गो. शर्मा ९९, नॅथन लिऑन नाबाद ९, झेवियर डोहर्टी ५, अवांतर (बाइज ८, लेगबाइज १२, नोबॉल ३) २३, एकूण १४१.५ षटकांत सर्व बाद ४०८.
बाद क्रम : १-१३९, २-१३९, ३-१५१, ४-१९८, ५-२४४, ६-२४४, ७-२५१, ८-३४८, ९-३९९, १०-४०८.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-०-४४-०, इशांत शर्मा ३०-८-७२-३, आर. अश्विन ४३.५-९-९७-२, प्रग्यान ओझा २८-५-९८-२, रवींद्र जडेजा ३१-७-७७-३.
भारत (पहिला डाव) : मुरली विजय खेळत आहे ८३, शिखर धवन १८५, अवांतर (बाइज ५, लेगबाइज ९, नोबॉल १) १५, एकूण ५८ षटकांत बिनबाद २८३
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ११-१-४६-०, पीटर सिडल १२-३-३५-०, मोझेस हेन्रिक्स ७-०-३८-०, नॅथन लिऑन १५-३-६९-०, झेवियर डोहर्टी १०-२-५७-०, स्टीव्हन स्मिथ ३-०-२४-०.